मुंबई - देशातील न्यायालयाचं काय कळत नाही? सरकारशी संगतमत करून आरेबाबतचा निर्णय शुक्रवारी घेतला गेला, शनिवार, रविवार कोर्ट बंद असतं. एका रात्रीत झाडे कापली गेली, फक्त ४४ झाडे उरली आहे. शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम ही कारवाई थांबवू शकले नाही. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख बोलतायेत आमच्या हातात सत्ता आली तर आरेचं जंगल वाचवू. आम्हाला मुर्ख समजता का? अशा शब्दात राज ठाकरेंनी शिवसेनेवर प्रहार केला आहे. राज ठाकरे यांची गोरेगाव येथे जाहीर सभा झाली, त्यात ते बोलत होते.
या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जर मेट्रो कारशेडसाठी कुलाब्यातील पोर्ट ट्रस्टची जमीन असताना आरेमध्ये जमिनीचा घाट का? मेट्रोची सुरुवात होते तिथे असणारी ही जागा नाकारली का जात आहे? आरेमधील जमीन बळकावून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव साधतायेत. जगात सर्वाधिक जास्त बिबटे नॅशनल पार्कमध्ये आहे. बोरिवलीतील नॅशनल पार्क सगळ्या बाजूने पोखरलं जातं आहे. या शहरामध्ये कोण येतंय? कोण राहतंय? काहीच थांगपत्ता नाही. बांग्लादेश, पाकिस्तानातून आलेले असंख्य नागरिक मुंबईत राहतायेत. बाहेरच्या देशातून लोकं राहतायेत त्यांच्यावर कोणतंही नियंत्रण नाही.
देशातील बँका बुडतायेत, लोकं बेघर होतायेत, उद्योगधंदे बंद होतायेत. अगोदरच्या सरकारकडून आपण थापा ऐकत होतो. २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण राज्याचा विकास आराखडा मी राज्यासमोर ठेवला होता. पक्ष स्थापन झाल्यावर मी पहिल्या सभेत सांगितलं होतं महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट येणार आहे. मी जोपर्यंत ब्ल्यू प्रिंट आणली तेव्हा एकाही पत्रकाराने विचारलं की त्यात काय आहे? विकासाचा आराखडा मांडणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मध्यंतरीच्या काळात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत सर्वांशी बोललो, सर्व विरोधी नेत्यांची बोललो, पत्रकार परिषद घेतली. त्याच दरम्यान कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पूर आला, त्यावेळी २१ तारखेला मोर्चा काढणार होतो ते राहून गेलो, ईडी चौकशीनंतर सांगितलं माझं थोबाड थांबणार नाही. मला फरक पडत नाही. हे महाराष्ट्राचं वातावरण आहे, जो राग सरकारबद्दल लोकांमध्ये आहे, तो राग व्यक्त नाही झाला तर निवडणुका घ्यायच्या कशाला? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, गडकिल्ले लग्न समारंभासाठी देणार? महाराष्ट्राला भूगोल अन् इतिहासपण आहे, गडकिल्ले लग्न समारंभाला देण्यासाठी बांधले नाहीत, शिवस्मारकानंतर सरकारचा मोर्चा रायगड किल्ल्याकडे, आमच्या देशातील नागरिक थंड झालेत. कोणी बोलायला तयार नाहीत? समाजातील संवेदना मरतात तेव्हा उतरतात फक्त प्रेतं. अशी जीवंत प्रेत होऊन जगायचं असेल तर तुमचं आयुष्य तुम्हाला लखलाभ अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
त्याचसोबत काँग्रेसचा विरोधी पक्षनेते भाजपात गेले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते भाजपा-शिवसेनेतून निवडणूक लढवित आहेत. बाळासाहेब असताना शिवसेनेत आयात करायची गरज कधीच भासली नाही? कार्यकर्ते संभ्रमात आहेत नेता एका रात्रीत पक्ष बदलतोय, राजकारणाची थट्टा लावली आहे. ज्या गोष्टी तुमच्या रोजच्या आयुष्याशी संबंधित असतात. प्रत्येक गोष्ट निवडणुकाशी निगडीत असतात. तरुणांना नोकरी कुठे द्यायची असा प्रश्न आई-वडिलांना पडला असेल. नोकऱ्या कुठून मिळणार? अशी परिस्थिती कुठेही पाहिली नाही असं टीकास्त्र राज ठाकरेंनी भाजपा-शिवसेनेवर सोडलं.