मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळींनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. मात्र आयारामांना तिकीट वाटपात सांभाळून घेताना दोन्ही पक्षाची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेते मंडळी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी विरोधी पक्षात प्रवेश करतानाचं चित्र आहे.
पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. युतीमध्ये पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला सोडण्यात आला आहे. याठिकाणी विद्यमान आमदार अमित घोडा यांना डावलून शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे अमित घोडा यांनी नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीसाठी पालघर मतदार संघातून शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द पाळला. मात्र त्यामुळे अमित घोडा नाराज झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप यांच्यात युती झाल्यामुळे पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे काँग्रेसमधून भाजप आणि भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वणगा कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत श्रीनिवास वनगा यांना विधानसभेत पाठविणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, वणगा कुटुंबीयांनाही उद्धव ठाकरे हे श्रीनिवास यांना विधानसभेची उमेदवारी देऊन दिलेला शब्द पूर्ण करतील, असा विश्वास होता. तसेच, पालघर विधानसभेसाठी लढण्याची इच्छा व्यक्त केली असता, ‘कामाला लागा’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, असे श्रीनिवास वनगा यांनी सांगितले होते.