मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून शिवसेनेचं शिष्टमंडळ दुपारी २.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी समर्थक आमदारांच्या सहीचं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना आमदारांची महत्वपूर्ण बैठक द रिट्रिट हॉटेलमध्ये सकाळी पार पडली, या बैठकीला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि गटनेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत राज्यपालांना देण्यात येणाऱ्या पत्रावर शिवसेनेच्या आमदारांची सही घेण्यात आली. त्यानंतर हे पत्र घेऊन शिवसेना नेते मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले तर शिवसेना नेते संजय राऊत हेदेखील मातोश्रीवर उपस्थित आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यायला हवं. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये आज त्यांचा कसोटीचा काळ आहे. जे बोलत होते ते करुन दाखविण्याची वेळ आलेली आहे. आम्ही सगळे एकत्र येत राज्यात स्थिर सरकार देऊ हा विश्वास शिवसेनेला आहे. शेतकरी, महागाई, बेरोजगारी, विकास या किमान समान कार्यक्रम धर्तीवर राज्यात या सरकार बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडत आहे. तर दिल्लीतही सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आज संध्याकाळी ७.३० पर्यंत शिवसेनेला राज्यपालांनी वेळ दिली आहे. मात्र राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली तर भाजपाला ७२ तासांची मुदत दिली हे समजून घेतलं पाहिजे. सरकार बनविणं आमचे कर्तव्य, जास्त मुदत मिळणे गरजेचे आहे. मात्र राज्याला राष्ट्रपती राजवटीपर्यंत ढकलायचं हे षडयंत्र रचलं जात आहे. ज्या घटनात्मक तरतूदीनुसार काम करता येईल ते करणार आहोत. आमच्या भूमिका राज्यपालांकडे मांडणार आहोत. शिवसेनेवर राज्यपालांनी सरकार बनविण्याची जबाबदारी निमंत्रण दिलं. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सरकार बसविण्याचा प्रयत्न करणार आहोत असं संजय राऊतांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
आता कसोटीचा काळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा; संजय राऊतांनी केलं आवाहन
भाजपच्या विरोधीपक्षात बसण्याच्या निर्णयावर चित्रा वाघ म्हणतात...
शिवसेनेला सत्तास्थापनेपासून दूर ठेवण्याची 'अशी' रणनीती; भाजपा कोअर कमिटीची पुन्हा बैठक
केंद्रीय मंत्री अरविंद सावंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार; शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता
शिवसेनेविरोधात भाजपाचं षडयंत्र; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा
भाजपाच्या अहंकारामुळे राज्यावर ही वेळ ओढवलीय, संजय राऊत यांचे टीकास्र