महाराष्ट्र निवडणूक २०१९: ...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 07:35 AM2019-11-05T07:35:40+5:302019-11-05T07:37:12+5:30

महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,

Maharashtra Election 2019: Shiv Sena editorial on Chief Minister Devendra Fadanvis | महाराष्ट्र निवडणूक २०१९: ...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका? 

महाराष्ट्र निवडणूक २०१९: ...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका? 

googlenewsNext

मुंबई - दिल्लीची हवा सध्या प्रदूषित आहे. धूळ व इतर विषारी द्रव्ये त्या हवेत पसरून सर्वत्र काळोख असल्यासारखे चित्र दिसत आहे. लोक धड पाहू शकत नाहीत व श्वास घेऊ शकत नाहीत. देशाच्या राजधानीत एकप्रकारे आरोग्य आणीबाणीच जाहीर झाली आहे. त्या गढूळ वातावरणात महाराष्ट्राला प्रकाश दाखवण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भूमिका मांडली आहे. 

महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मऱहाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे.  दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. 

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे 

  • देशात आणि आपापल्या राज्यात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतील तो पहिला धडा असतो. सध्या महाराष्ट्रात काय चालले आहे हे जाणून घेण्याची धडपड संपूर्ण देशात सुरू आहे. 
  • शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार व आपण स्वतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार.’ मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांमुळे राज्यातील गुंता सुटेल व एक सरकार मिळेल असे समजायला हरकत नाही. 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअमित शहा यांना भेटून सरकार स्थापण्याचे भाष्य करतात म्हणजे नक्कीच त्यांनी जुळवाजुळव केली असेल व बहुमताचा आकडा वस्त्रगाळ करून जमवला असेल. जेव्हा अंतःकरण भरून येते तेव्हा आपल्या मनातील भावना आणि कल्पना व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतात असे काहीसे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दिसले 
  • दिल्लीची हवा गढूळ, विषारी असली तरी महाराष्ट्राची हवा स्वच्छ व शुभ्र आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट स्पष्ट आणि लख्ख दिसत आहे. कोणाचे काय चालले आहे व कोणाच्या काय भावना आहेत ते लपून राहिलेले नाही. 
  • महाराष्ट्राची हवा गढूळ नसली तरी ओला दुष्काळ आणि महागाईच्या आगीत जनतेची कोंडी झाली आहे. गॅसचा सिलिंडर 651 रुपये झाला, कोथिंबिरीची जुडी 100 रुपये पार झाली. भाजप 144 पार झाला नाही व शिवसेनाही शंभर पार झाली नाही तरी गाजर, मटार, भेंडी, आले, गवारसारख्या भाज्यांनी ‘120’ पार केले आहे. हे सगळे कसे शमवायचे? हा प्रश्नही आहेच. 
  • सरकार स्थापनेसाठी ‘आकडा’ वाढता असणे आवश्यक असले तरी भाजीपाल्याच्या वाढलेल्या दराचा आकडा लवकर कमी होणे त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे. सरकारसाठी लागणाऱ्या बहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील, पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरवण्यासारखेच आहे. 
  • गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणे रंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची!
     

Web Title: Maharashtra Election 2019: Shiv Sena editorial on Chief Minister Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.