Maharashtra Election 2019 : काळाचा महिमा... बाळासाहेबांनी ज्या लुंगीला केला विरोध; तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:24 AM2019-10-15T10:24:55+5:302019-10-15T10:52:21+5:30
Maharashtra Election 2019: शिवसेनेसाठी हा सारा काळाचा महिमा आहे की काय, अशी चर्चा सुरु आहे.
मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरणारी ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिले जात आहे.
आदित्य ठाकरे हे दक्षिण मुंबईतीलवरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंसह येथील शिवसेनेचे आजी-माजी आमदार दिवसरात्र त्यांच्या प्रचारात मेहनत घेताना दिसत आहेत.
एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'बजाव पुंगी, भगाव लुंगी' असा नारा दाक्षिणात्यांविरुद्ध दिला होता. मात्र, याला बगल देत आता दाक्षिणात्यांचीही मते शिवसेनेला गरजेची वाटू लागली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे स्वत: लुंगी नेसून मुंबईत असलेल्या दाक्षिणात्यांची मते मागताना दिसत आहेत.
याशिवाय, आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या शिवसेनेला गुजराती मते महत्त्वाची वाटू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ वरळी मतदारसंघात लागलेल्या 'केम छो वरली' अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. फक्त गुजरातीच नव्हे तर मराठीव्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ लावण्यात आले होते.
विशेष म्हणजे, एकेकाळी मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने आधी हिंदी आणि गुजरातीसह इतर भाषांमधून प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी हा सारा काळाचा महिमा आहे की काय, अशी चर्चा सुरु आहे.