Maharashtra Election 2019: कॅश, कार, बँक बॅलन्स अन् बरंच काही... आदित्य ठाकरेंची कोटींची संपत्ती प्रथमच जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:36 PM2019-10-03T13:36:25+5:302019-10-03T13:39:59+5:30
प्रतिज्ञापत्रातून आदित्य यांनी जाहीर केली संपत्ती
मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी आज वरळी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रातून त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीची माहिती दिली. आदित्य हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणारे पहिलेच ठाकरे आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना करणारे राज ठाकरे यांनी आतापर्यंत एकदाही निवडणूक लढवलेली नाही.
आदित्य ठाकरेंनी विधानसभा क्षेत्रात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. आदित्य यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक अर्ज जाखल करण्यापूर्वी वरळीत रोज शो केला. या निमित्तानं शिवसेनेनं वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. तत्पूर्वी आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरुन निघताना बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. अर्ज भरण्यासाठी घरातून निघताना आदित्य आजोबांच्या खोलीत गेले. त्या ठिकाणी असलेल्या बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक झाले. आदित्य यांनी हा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये बाळासाहेबांनी वापरलेल्या विविध वस्तू दिसत आहेत. यामध्ये बाळासाहेबांचा बेड, त्यावर बाळासाहेबांची स्वाक्षरी असलेली उशी, त्यांचं उपरणं, काही पुस्तकं, कागदपत्रं यांचा समावेश आहे.
वरळीतून लढणाऱ्या आदित्य ठाकरेंसमोर फारसं आव्हान नाही. सध्या शिवसेनेचेच सुनील शिंदे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी असेल. आदित्य रिंगणात असल्यानं राज ठाकरेंच्या मनसेनं वरळीत उमेदवार दिलेला नाही. मनसेनं जाहीर केलेल्या दोन यादींमध्ये वरळी मतदारसंघाचा समावेश नाही.