मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढतच चाललेला आहे. मुख्यमंत्रिपदावर शिवसेना ठाम आहे. शिवसेना आमदारांची महत्वाची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री या निवासस्थानी झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची युती करताना जे ठरलं होतं तेच द्यावं या मागणीवर ठाम असल्याची माहिती शिवसेना आमदार शंभुराजे देसाई यांनी सांगितले. या बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते तर बैठकीतील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी आमदारांच्या मोबाईल घेण्यास बंदी केली होती.
शिवसेना आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याने राज्यातील सत्तास्थापनेत पेच निर्माण झाला आहे. कोणत्याही पक्षाकडे स्वबळावर बहुमत नसल्याने राज्यात युती अथवा आघाडी सरकारशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. यातच भाजपा-शिवसेना महायुतीने निवडणुका एकत्र लढविल्या पण बहुमत असतानाही या दोन्ही पक्षात मुख्यमंत्रिपदावरुन तिढा निर्माण झाला आहे. भाजपाचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. पण अल्पमतात सरकार स्थापनेचा दावा भाजपा करणार नाही असं स्पष्ट मत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले आहे.
दुसरीकडे आमदार फुटण्याची भीती असल्याने शिवसेनेने भाजपाला इशारा दिला आहे. शिवसेना आमदाराच्या आसपास फिरकण्याची हिंमत करुन दाखवावी. तसेच कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. गुंड आणि पैशाच्या जोरावर आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर आमदाराचा सन्मान राखला जाईल, शिवसेनेचा आमदार विचाराने प्रभावित आहे, शिवसेनेचा आमदार फुटणार नाही, सत्तेच्या विरोधात भाजपा-शिवसेना १५ वर्ष राहिली आहे. त्यामुळे आमदार फुटेल असं वाटत नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
तर कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तर ज्या पक्षाचा आमदार फुटेल त्याच पक्षाचा उमेदवार मतदारसंघात उभा केला जाईल. त्याला सर्व पक्ष मिळून पाठिंबा देऊ अन् फुटलेल्या आमदाराचा पराभव करु असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सत्तेच्या राजकारणात आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या युवा आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं कुठंही सांगितले नाही. शिवसेनेवर राज्यात बसवू पण आयुष्यभर राज्यातून बाहेर होऊ अशी भीती काँग्रेसच्या मनात आहे. केंद्रीय नेतृत्वाने आम्ही धर्मनिरपेक्षक आहोत असं सांगत आहे. काँग्रेसची भूमिका विरोधी पक्षात बसण्याची आहे. राष्ट्रवादीनेही ती भूमिका अनेकदा मांडली आहे असंही सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले आहे.