Join us

बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसेना-मनसेत टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:51 AM

Maharashtra Election 2019: मराठी लोकवस्ती असल्याने माहीम मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच सुरू आहे.

-शेफाली परब-पंडित

मुंबई : मराठी लोकवस्ती असल्याने माहीम मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे टक्कर देणार आहेत. इंजीन धडधडत राहण्यासाठी येथे संधी असल्याने मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर बालेकिल्ल्यात भगवा फडकत ठेवण्यासाठी शिवसेनेची कसोटी लागणार आहे.

२००९ विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई येथे आमदारपदी निवडून आले. त्या वेळेस शिवसेनेचे उमेदवार आदेश बांदेकर तिसऱ्या क्रमांकावर होते. २०१४ मध्ये काँग्रेसवारी करून पक्षात परतलेले सदा सरवणकर येथे आमदारपदी निवडून आले. मनसेला दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. या मतदारसंघात अवघे चार उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे उमेदवार प्रवीण नाईक आणि अपक्ष उमेदवार मोहनीश राऊळ मैदानात असले तरी खरी लढत सरवणकर आणि देशपांडे यांच्यात रंगणार आहे.

जमेच्या बाजू

विद्यमान आमदार असून मतदारसंघात भक्कम बांधणी. २००९ मध्ये काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवूनही शिवसेनेपेक्षा अधिक मते मिळवली.लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे ९१ हजार ६३५ मते माहीम मतदारसंघातून मिळाली.मनसेच्या खळ्ळ्खट्याक आंदोलनामुळे चर्चेतला चेहरा. तरुण मतांसाठी सेलीब्रिटींची फौज प्रचारासाठी मैदानात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, दांडगा जनसंपर्क. २०१४ विधानसभा निवडणुकीत मनसेची हवा सरल्यानंतरही नितीन सरदेसाई यांना दुसºया क्रमांकाची मते होती.

उणे बाजू

मनसे स्पर्धेत असल्याने मराठी मतांची विभागणी होणार आहे़ अन्य ठिकाणी मनसेची पिछेहाट झाली तरी येथे समर्थकांची संख्या मोठी आहे. मराठी अस्मिता हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता. पार्किंगची समस्या आणि जुन्या इमारतींचा प्रश्न रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची तुलनेने मोठी फौज, महापालिका निवडणुकीत माहीम मदारसंघात पूर्ण सफाया, लोकसभा निवडणुकीत हवा निर्माण करूनही मनसेचा प्रभाव दिसून आला नाही. युतीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला, तीच हवा कायम राहिल्यास मनसेला मते फिरवणे अवघड जाईल.

टॅग्स :माहीमसंदीप देशपांडेमनसेशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019