महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्राचे राज्यपाल अत्यंत दयावान; उद्धव ठाकरेंचा टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 08:47 PM2019-11-12T20:47:45+5:302019-11-12T20:48:00+5:30
राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्यचे देखील सांगण्यात येत होते.
मुंबई: राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्यचे देखील सांगण्यात येत होते. मात्र राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली नसल्याचे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. तसेच यासोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल अत्यंत दयावान असल्याचे म्हणत राज्यपालांना टोला देखील लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी 48 तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी थेट सहा महिन्यांचीच मुदत दिली. त्यामुळे महाराष्ट्राला एवढा दयावान माणूस लाभला तर राज्याचं भलं होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोमणा देखील लगावला आहे.
राष्ट्रपती राजवटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; शिवसेनेवर निशाणा
काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल कोणती भूमिका घेणार हे आजही ठरलेलं नाही. त्यामुळे एनडीएनतून बाहेर पडलेली शिवसेना अद्याप वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आज निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आता आमच्याकडे भरपूर वेळ असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला ‘वेटिंग’वर ठेवलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार आणि अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेचा पाठिंबा वेटिंगवरच; काँग्रेस-राष्ट्रवादीचा अंतिम निर्णय नाहीच!
विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.