महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरीचा फटका, आपापले गड राखण्यात युतीला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 03:59 AM2019-10-25T03:59:49+5:302019-10-25T06:12:23+5:30

Maharashtra Election 2019: मुंबई, ठाण्यासह महामुंबईच्या पट्ट्यात आपापले गड राखण्यात शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले, असले तरी ‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला.

Maharashtra Election 2019: shiv sena vishwanath mahadeshwar Loss in Vandre east | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरीचा फटका, आपापले गड राखण्यात युतीला यश

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरीचा फटका, आपापले गड राखण्यात युतीला यश

Next

मुंबई : मुंबई, ठाण्यासह महामुंबईच्या पट्ट्यात आपापले गड राखण्यात शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले, असले तरी ‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला. तेथे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा दारुण पराभव झाला.मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे ताकदवान उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव करत बंडखोर गीता जैन यांनी घवघवीत यश मिळवले. उरणमध्ये शिवसेना, शेकापला अटीतटीची लढत देत भाजपचे बंडखोर महेश बालदी यांनी मिळवलेले यश चर्चेत राहिले.

रायगडच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा सुपडा या निवडणुकीत साफ झाला, तर पालघरमध्ये शिवसेनेने जंग जंग पछाडूनही बहुजन विकास आघाडीने तिन्ही जागा राखल्या. संघाच्या कामामुळे डहाणू आणि विक्रमगड हे मतदारसंघ भाजपचे गड मानले जात होते. मात्र माकपने कडवी झुंज देत डहाणूची जागा खेचून घेतली. मंत्रिपदी असल्यापासून विक्रमगडमध्ये विष्णू सवरा यांच्याबद्दल नाराजी होती. तेथे त्यांच्या मुलाला संधी देण्यात आली. ते संघाच्या शिस्तीतील कार्यकर्ते असले तरी आदिवासींमध्ये विश्वास निर्माण करण्यात राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यशस्वी ठरले. त्यामुळे तेथे भाजपची पाटी कोरी झाली.

मुंबईत विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता, सरदार तारासिंग या मातब्बर उमेदवारांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यातून बंडखोरीची भीती होती, मात्र ती शमवण्यात पक्षनेतृत्वाला यश मिळाले. शिवसेनेने वांद्रे पूर्व आणि वरळीचा अपवाद वगळता जुनेच चेहरे कायम ठेवले. त्यापैकी वरळीत आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील पहिल्याच नेत्याने विधानसभेत प्रवेश केला.

मुंबईत भाजप आणि शिवसेना यांची संघटनात्मक बांधणी सर्वच स्तरांवर चांगली असल्याने माफक बदल वगळता त्यांना २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती करता आली. त्या तुलनेत काँग्रेस पक्षाला मागच्या पराभवानंतरही उभारी घेता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेव जागा मिळवत पुन्हा उघडलेले खाते, एमआयएमची संपलेली, तर समाजवादी पक्षाने राखलेली ताकद हेही मुंबईच्या निकालाचे वैशिष्ट्य ठरले.

मनसेचा मुंबईवर प्रभाव पडत नसल्याचे सलग तिसऱ्या निवडणुकीत स्पष्ट झाले. अवघ्या दोन-तीन ठिकाणी मनसेचे उमेदवार दुसºया स्थानी होते. शिवसेनेचे ठाणे ही उपाधी कायम राखत त्या शहरातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेने राखले आणि एका मतदारसंघात भाजपला साथ दिली. तोच कित्ता डोंबिवली, कल्याण पूर्व-पश्चिमेत गिरवला. कल्याणच्या दोन्ही मतदारसंघांत बंडखोरांना मतदारांनी साथ दिली नाही.

सेनेतील गटबाजीचा फटका : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव हा शिवेसनेच्या प्रतिष्ठेला मोठा तडा मानला जातो. मातोश्रीच्या अंगणातील ही बंडखोरी टाळता आली असती. मात्र शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांनी बंडखोरी केली आणि त्याचा फायदा काँग्रेसला वांद्रे पूर्वची जागा मिळण्यात झाला. झिशान सिद्दिकी यांचा या मतदारसंघात विजय झाला. त्यातून नवे नेतृत्व उदयाला आले.

मेहतांच्या आक्रमकतेला मुरड : मीरा-भाईंदरचे अनभिषिक्त सम्राट अशी ओळख बनविलेले नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेसोबत कडवा संघर्ष होता. त्यातच गीता जैन यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांना आव्हान दिले. मात्र कोंडी सुरू होताच जैन यांनी गप्प न राहता त्याविरुद्ध आवाज उठवला. या वेळी विधानसभेला संधी नाकारताच त्या आक्रमकपणे रिंगणात उतरल्या. त्यांना काँग्रेसचे आव्हान मिळेल, असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही. त्यांनी जोरदार मुसंंडी मारली.

यंदा बदल काय झाला?
सेनेच्या ताब्यातील वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर या जागा विरोधकांकडे गेल्या. चांदिवली आणि भायखळा या जागा सेनेने विरोधकांकडून खेचून आणल्या. नसीम खान यांना चांदिवलीत सेनेच्या दिलीप लांडे यांनी कडवी झुंज देत पराभूत केले. माकपने डहाणूत पुन्हा लाल बावटा फडकावला. भाजपकडून भांडून मिळवलेला कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेने राखला.

Web Title: Maharashtra Election 2019: shiv sena vishwanath mahadeshwar Loss in Vandre east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.