महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 12:00 PM2019-11-07T12:00:09+5:302019-11-07T12:00:50+5:30
काँग्रेसच्या युवा आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं कुठंही सांगितले नाही.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढत असताना दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसांत भाजपाच्या माध्यमातून योग्य निर्णय करत राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने पावलं उचलणार आहोत. राजकीय स्थितीची राज्यपालांना माहिती देणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा करायचा की नाही, यावर राज्यपालांशी चर्चा केल्यावर निर्णय घेऊ असं भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले की, शिवसेनेसोबत सरकार बनवावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमताचं सरकार भाजपा कधीही बसविणार नाही. शिवसेनेसोबत काही स्तरावर चर्चा सुरु आहे पण माध्यमांमधून शिवसेनेचं चर्चेचं दार बंद आहे असं दिसतं. भाजपाने लाखो लोकांच्या साक्षीने भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांचे मोठे भाऊ आहेत. उद्धव ठाकरे सरकारचे मार्गदर्शक आहेत. भाजपा-शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ते समजावं, देवेंद्र फडणवीस यांच्यारुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगत मुनगंटीवारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
Sudhir Mungantiwar,BJP: We want to run a strong and stable government, we wish to form the Govt with Shiv Sena. Uddhav ji had himself said earlier that Devendra Fadnavis ji is also a Shiv Sainik. #Maharashtrapic.twitter.com/cRgVJrdlX6
— ANI (@ANI) November 7, 2019
तसेच ९ तारखेनंतर भाजपाची भूमिका राज्यपालांना अवगत करणार आहोत. घटनात्मक तरतुदींबाबत राज्यपालांची चर्चा करणार आहेत. शिवसेनेसोबत युती करा, दुसरा पर्याय बघू नका ही केंद्राची सूचना राज्याला देण्यात आली आहे. नितीन गडकरी राज्यात परतणार नाही असंही मुनगंटीवारांनी सांगितले आहे. त्याचसोबत आमदार फोडण्याच्या आरोपावरही त्यांनी भाष्य केलं आहे. आमदाराचा सन्मान राखला जाईल, शिवसेनेचा आमदार विचाराने प्रभावित आहे, शिवसेनेचा आमदार फुटणार नाही, सत्तेच्या विरोधात भाजपा-शिवसेना १५ वर्ष राहिली आहे. त्यामुळे आमदार फुटेल असं वाटत नाही असं त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाजनादेश शिवसेना, भाजपा महायुतीला आहे. या क्षणापर्यंत आमचा प्रयत्न हाच आहे. शिवसेनेसोबतच युती करावी यादृष्टीने विधानं केली आहे. शिवसेनेने भूमिका घ्यावी, प्रयत्न करणाऱ्यांचा पराभव होत नाही. वेट अॅन्ड वॉचची भूमिका सगळ्यांचीच आहे. शेवटी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, नेते यांचा ३० वर्षाचा संबंध आहे. या संबंधातून निश्चितपणे चांगले घडणार आहे. महायुतीचं सरकार येईल असा विश्वास आहे असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही
काँग्रेसच्या युवा आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं कुठंही सांगितले नाही. शिवसेनेवर राज्यात बसवू पण आयुष्यभर राज्यातून बाहेर होऊ अशी भीती काँग्रेसच्या मनात आहे. केंद्रीय नेतृत्वाने आम्ही धर्मनिरपेक्षक आहोत असं सांगत आहे. काँग्रेसची भूमिका विरोधी पक्षात बसण्याची आहे. राष्ट्रवादीनेही ती भूमिका अनेकदा मांडली आहे.
संघ भाजपाचा समर्थक नाही
संघ राजकारणात सक्रियतेने भाग घेत नाही, देशहिताच्या प्रश्नासाठी संघ सहभाग घेतो, मुख्यमंत्री कोण, मंत्री कोण याकडे संघ लक्ष देत नाही. संघाच्या विविध कार्यक्रमात काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही सहभागी होतात. संघ हा भाजपाचा समर्थकही नाही अन् काँग्रेसचा विरोधक नाही. दुर्दैवाने अनेकांचा समज आहे संघ भाजपासाठी काम करतो. संघाच्या दृष्टीने देश महत्वाचा आहे. कोणीही सरसंघचालकांची भेट घेऊ शकतो. सरसंघचालकाचं प्रेम जेवढं भाजपाच्या नेत्यांवर आहे, तेवढचं शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांवर आहे.