Join us

Maharashtra Election 2019: वरळीत अभिजीत बिचुकलेंच्या आव्हानावर आदित्य ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:16 PM

Worli Vidhan Sabha Election 2019: बिग बॅास फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. 

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात इतिहासात पहिल्यांदाच  ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल आहे. या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश माने यांना मैदानात उतरविले आहे. त्यातच बिग बॅास फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकलेवरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. 

आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून त्यांच्या विरोधात उभे असलेल्या अभिजीत बिचुकले यांच्याबद्दल विचारल्यावर मी कधीही समोरच्या उमेदवारावर बोलत नाही. मी शिवसेना आणि शिवसैनिकानी केलेलं काम याच्यावरच बोलत असल्याचे सांगत अभिजीत बिचुकले यांच्यावर प्रतिक्रिया देणं तुर्तास तरी आदित्य ठाकरे यांनी टाळले आहे.  

 अभिजीत बिचुकलेंना आदित्य ठाकरेंच्या आव्हानबद्दल विचारले असता, आदित्य हा माझ्यासाठी युवराज वगैरे कुणीही नाही. छत्रपती उदयनराजेंना मी आव्हान देतो, तर छत्रपतींची प्रतिमा वापरुन हे मोठे झालेले आहेत. छत्रपतींच्या 13 व्या वंशजांना मी गेल्या 20 वर्षांपासून विरोध केलाय. त्यामुळे आदित्यला मी किरकोळ बाब समजतो. बिग बॉसमधून मुंबई नगरीशी माझं जवळीच नातं जडलं आहे. आनंद चव्हाण यांनी मला बिग बॉसमध्ये आणलं होतं. याच बिग बॉसमधून मी बाहेर पडलो, तेव्हा मुंबईकरांनीच मला ट्रेंडिंग ठेवलं. त्यामुळे मुंबईकरांची सेवा करण्यासाठी मुंबईला आलोय, असं अभिजीत बिचकुलेंनी सांगितलं होतं.

ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. वरळीतून आदित्य यांना उमेदवारी मिळाल्याने त्याविरोधात मनसे, आघाडीने त्या तोडीचा उमेदवार दिला नव्हता. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या या यादीत वरळीतून माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. गौतम गायकवाड असे उमेदवाराचे नाव आहे. गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत.

टॅग्स :आदित्य ठाकरेअभिजीत बिचुकलेवरळीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेना