Join us

Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंचा रोड शो पाकीटमारांच्या पथ्यावर; सचिन अहिर, चेंबुरकरांचे खिसे कापले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 8:21 PM

वरळी विधानसभा 2019- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी आज वरळी विधानसभा क्षेत्रातून मोठ्या रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रर्दशन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी आज वरळी विधानसभा क्षेत्रातून मोठ्या रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रर्दशन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरेंनीविधानसभा क्षेत्रात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. आदित्य ठाकरे यांच्या भव्य रॅलीचा फायदा शिवसेनेला होईल की नाही हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे. मात्र सध्या तरी आदित्य ठाकरे यांच्या आजच्या शक्तीप्रर्दशनाचा फायदा चोरट्यांना झाल्याचे समोर आले आहे. 

राज्याच्या राजकारणात ५० वर्षांपासून सक्रीय असलेलं ठाकरे घराणं कधीही राजकारणात उतरलेलं नाही. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे असो,वा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना करणारे राज ठाकरे, यापैकी कोणत्याही नेत्यानं कधीही स्वत: निवडणूक लढवलेली नाही. मात्र आदित्य ठाकरेंनी ही परंपरा मोडीत काढली आहे. त्यामुळे या ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगण्यात उरल्यानंतर आज वरळीमध्ये शिवसेनेने भव्य रॅलीचे आयोजन करुन शक्तीप्रर्दश केले. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या शक्ती प्रर्दशनाचा फायदा चोरट्यांना झाला आहे. आदित्य ठाकरेंच्या रॅलीमध्ये शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्यासह आशिष चेंबुरकर आणि हरीश वरळीकर या दिग्गज नेत्यांचे चोरट्यांनी पाकीट मारल्याचे समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या रॅलीमध्ये अनेक स्थानिक नेत्यांचे पाकीट चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. वरळीमधील ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात आतापर्यत एकूण 13 चोरी संर्दभातील तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये एका महिलेचे मंगळसुत्र लंपास झाल्याची देखील तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच स्थानिक कार्यकत्यांचे जवळपास 100पेक्षा जास्त पाकीट चोरीला गेले आहे. तसेच यामध्ये एका व्यक्तीची सोनसाखळी देखील चोरी झाल्याचे समोर आले आहे. 

 

टॅग्स :आदित्य ठाकरेवरळीशिवसेनासचिन अहिरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019