Maharashtra Election 2019 : मुंबईवरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचे शिवसेनेसमोर आव्हान'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:47 AM2019-10-05T03:47:52+5:302019-10-05T03:48:26+5:30

राज्यातील जागावाटपात भाजप मोठा भाऊ असला, तरी मुंबईत मात्र शिवसेनेकडे जादा जागा आल्या आहेत. जागावाटपातील शिवसेना नावाच्या मोठ्या भावाला निकालातही आपले थोरलेपण राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे

Maharashtra Election 2019 : Shiv Sena's challenge to re-establish supremacy over Mumbai | Maharashtra Election 2019 : मुंबईवरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचे शिवसेनेसमोर आव्हान'

Maharashtra Election 2019 : मुंबईवरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचे शिवसेनेसमोर आव्हान'

Next

मुंबई : राज्यातील जागावाटपात भाजप मोठा भाऊ असला, तरी मुंबईत मात्र शिवसेनेकडे जादा जागा आल्या आहेत. जागावाटपातील शिवसेना नावाच्या मोठ्या भावाला निकालातही आपले थोरलेपण राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे, तर विनोद तावडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी नाकारत, भाजप श्रेष्ठींनी मुंबईच्या सत्तासमीकरणेच बदलण्यास सुरुवात केली आहेत. मुंबईतील काही जागांवर असंतुष्टांनी बंडाचा झेंडा उभारल्याने त्यांना शांत करण्याचे काम युतीच्या नेत्यांना करावे लागणार आहे. मात्र, काँग्रेस आघाडीसह मनसेची सध्याची अवस्था पाहता युतीमधील अस्वस्थतेचा त्यांना फारसा फायदा उचलता येईल, अशी स्थिती नाही.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, भाजप श्रेष्ठींनी धक्कातंत्राचा वापर करत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा बोरीवलीतून पत्ता कट केला. त्यांच्या जागी मुंबई भाजपचे पदाधिकारी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली, तसेच घाटकोपर पूर्वेतून माजी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना डावलून पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली. मेहता यांचे मंत्री पद गेले असले, तरी त्यांचे तिकीट कापले जाईल, असे स्थानिक कार्यकर्त्यांना वाटत नव्हते. या दोघांच्या जोडीला कुलाब्यातून राज पुरोहित यांच्या जागी राहुल नार्वेकर आणि मुलुंड येथून सरदार तारासिंग यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली.

भाजपने चार विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला. यातील तावडे यांच्याबाबचा निर्णय मुंबई भाजपमधील एकूण सत्ता समीकरणांना धक्का लावणारी आहे, तर युतीतील मित्रपक्ष शिवसेनेने विद्यमान आमदार अशोक पाटील आणि तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारली आहे. दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर गुरुवारी रात्री ठिय्या मांडत आपली नाराजी व्यक्त केली. पाटील यांच्या जागी नगरसेवक रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर तृप्ती सावंत यांच्या जागेवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सहा जागा वगळता उर्वरित विद्यमान आमदारांना संधी देण्याचे धोरण युतीने स्वीकारले आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रचारात सहभागी होणार नसल्याची घोषणा केली. निरुपम, मिलिंद देवरा या दृश्य संघर्षासोबत काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीपर्यंत गटबाजी पाहायला मिळते़

युतीच्या जागावाटपात मुंबईतील ३६ पैकी सर्वाधिक १९ जागा शिवसेसेनेकडे आल्या आहेत, तर भाजपकडे १७ जागा असणार आहेत. मुंबईतील जागावाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाले आहे. मागील निवडणुकीत भाजपने मुंबईत १५ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने १४ ठिकाणी विजय नोंदविला होता. या २९ जागांवर सध्या ज्या पक्षाचा आमदार आहे, त्याच पक्षाकडे ती जागा देण्याचे धोरण दोन्ही पक्षांनी स्वीकारले. २०१४ पूर्वीचा इतिहास बाजूला ठेवून या २९ जागांचा निर्णय झाला.

मनसेतील ज्येष्ठांची माघार
बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई असे दिग्गज नेते यंदा निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत तर मनसे नेतेसुद्धा त्यांचा पक्ष निवडणूक लढविणार का, याचे ठोस उत्तर देऊ शकत नव्हते. स्वत: राज यांनी ५ आॅक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले होते. ती सभा काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. एकूणच भविष्यातील राज यांचा सभा वगळता सध्या तरी पक्ष म्हणून मनसेने फार काही तयारी केल्याचे चित्र नाही.

Web Title: Maharashtra Election 2019 : Shiv Sena's challenge to re-establish supremacy over Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.