राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येईल अन् शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल; काँग्रेस नेत्याचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 10:39 AM2019-11-12T10:39:10+5:302019-11-12T10:39:58+5:30
तसेच राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं.
दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत काँग्रेसची खलबतं सुरु आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसची कोणतीही भूमिका स्पष्ट झाली नसल्याने ऐनवेळी शिवसेनेची कोंडी झाली. मुदतीत पाठिंब्याचं पत्र मिळविण्यात शिवसेना अपयशी ठरली. अशातच शिवसेनेला वाढीव मुदत देण्यास राज्यपालांनी नकार दिला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आज पुन्हा दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक होणार आहे.
काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांनी सांगितले की, सध्या सत्तास्थापनेबाबत प्रक्रिया सुरु आहे. शेवटी अंतिम निर्णय सकारात्मक असेल. मला वैयक्तिक वाटतं की, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना मिळून सरकार स्थापन करतील. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Kagda Chandya Padvi,Congress leader from Maharashtra: Process is still underway,but end result will be positive. Personally I think the three(Shiv Sena-Congress-NCP) parties will form the Govt and a Shiv Sena leader will be the CM. pic.twitter.com/ty7WSwvSHn
— ANI (@ANI) November 12, 2019
तसेच राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. आज रात्री ८.३० पर्यंत राष्ट्रवादीला राज्यपालांना उत्तर देण्यासाठी मुदत आहे. यावर अजित पवार म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र मिळून निर्णय घेतला तर त्यातून काही मार्ग निघेल. जयपूरहून काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले. आज ते महाराष्ट्रात येतील त्यानंतर त्यांच्याशी चर्चा होणार आहे. आम्ही दोघांनी एकत्र निवडणुका लढल्या आहेत दोघं मिळून निर्णय घेण्याची गरज आहे. शिवसेना-भाजपाचं बिनसलं म्हणून शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. राज्यपालांनी २४ तासाचा वेळ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे असं त्यांनी सांगितले.
सोमवारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांनी भेट घेतली. या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही असा विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात अद्यापही शिवसेना-महाआघाडी यांच्या सत्तास्थापनेबाबत आशा काही नेत्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
...म्हणून शिवसेनेला पत्र देण्यास अडचण आली; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
हम होंगे कामयाब! रुग्णालयातून संजय राऊतांनी शिवसेनेला दाखविला सत्तेसाठी आशेचा किरण
... म्हणून काँग्रेसनं शिवसेनेला समर्थन पत्र दिलं नाही, पवारांचा 'तो' एक कॉल
...म्हणून भाजपाने सरकार बनविण्यात असमर्थता दाखविली; अमित शहांच्या बैठकीत काय घडलं होतं?
सत्तास्थापनेच्या तिढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आज पत्ते उघडणार; शिवसेना करणार का स्वीकार?