महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'तडजोडीत कमी जागा लढल्या मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:40 PM2019-10-22T17:40:53+5:302019-10-22T17:41:25+5:30

प्रत्येक वेळी तडजोड केली म्हणजे झुकलो असं म्हणता येणार नाही.

Maharashtra Election 2019: 'Shiv Sena's strike rate will be good if it contests fewer seats in compromise Says Anil Parab | महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'तडजोडीत कमी जागा लढल्या मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार'

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'तडजोडीत कमी जागा लढल्या मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार'

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र प्रत्यक्ष निकालात शिवसेनेला किती जागा मिळतात हे पाहणे गरजेचे आहे. शिवसेना-भाजपाची युती आहे, त्यामुळे सत्ता आली तर ती युतीची असणार आहे. राजकारणात एक पाऊल मागे घ्यावे लागतात कारण दहा पाऊलं पुढे जायची असतात असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, तडजोडीत आम्ही कमी जागा लढल्या असतील मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार आहे. प्रत्येक वेळी तडजोड केली म्हणजे झुकलो असं म्हणता येणार नाही. शिवसेनेची भूमिका सत्तेत असो वा नसो लोकहितासाठी असते.आम्ही सत्तेत राहून जो संघर्ष केला तो शिवसेनेच्या स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी केला. लोकांच्या बाजूने उभं राहण्याची गरज असते तेव्हा शिवसेना लोकांच्या बाजूने उभी राहते. भविष्यकाळात शिवसेना लोकांच्या बाजूने उभं राहणार असं त्यांनी सांगितले. 
तसेच लोकांची सेवा करायची असेल तर सत्तेत राहणे गरजेचे आहे. सत्तेसाठी तडजोड केली म्हणजे लोकांच्या सेवेसाठी तडजोड केली आहे. मित्रपक्षांना सामावून घेण्यासाठी शिवसेनेने मन मोठं करुन युतीत भाजपाला जागा सोडल्या. शिवसेना राज्यभरात १२४ आणि २ अशा १२६ जागा लढवित आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहणार आहे. शिवसेना शंभर अथवा त्याहून अधिक जागा जिंकू शकते असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, भाजपा पूर्ण बहुमतात येईल, स्वबळावर सत्ता मिळवेल असं नारायण राणे सांगतात यावर बोलताना परब म्हणाले की, राणे ज्या पक्षात असतात त्यापक्षाची बाजू मांडत असतात. ज्यांनी अमित शहांवर, भाजपावर टीका केली होती ते आता त्यांचे स्तुतिसुमने गात आहेत. लहान भाऊ, मोठा भाऊ हा सोयीप्रमाणे वापरायचे शब्द आहेत. आमच्या सगळ्यांचे वडील एकच होते बाळासाहेब ठाकरे. जागा किती लढतोय त्यावर नव्हे तर जागा किती जिंकतो हे महत्वाचं आहे. निकालाच्या नंतर मुख्यमंत्री, मंत्री याबाबत सगळं पक्षप्रमुख निर्णय घेतील. कोणाच्या वाट्याला कोणतं पद येणार हे अमित शहा, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हेच स्पष्ट करतील असंही अनिल परब यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: Maharashtra Election 2019: 'Shiv Sena's strike rate will be good if it contests fewer seats in compromise Says Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.