बाळासाहेबांची शिवसेना पक्षात उरली आहे का?; विद्यमान आमदाराची उद्धव ठाकरेंवर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:44 PM2019-10-04T15:44:50+5:302019-10-04T16:40:11+5:30
1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून आईवडिलांपासून शिवसेनेचं काम केलं. नारायण राणेंनी बंडाळी केली तेव्हा भांडूपमध्ये अनेक पदाधिकारी राणेंसोबत गेले.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत भांडूप मतदारसंघातून अशोक पाटील या विद्यमान आमदाराचं तिकीट कापून शिवसेनेने रमेश कोरगावकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या अशोक पाटील समर्थकांना मातोश्री बंगल्याबाहेर जमत ठिय्या आंदोलन केलं. तसेच यावेळी अशोक पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
यावेळी बोलताना अशोक पाटील म्हणाले की, 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून आईवडिलांपासून शिवसेनेचं काम केलं. नारायण राणेंनी बंडाळी केली तेव्हा भांडूपमध्ये अनेक पदाधिकारी राणेंसोबत गेले. त्यावेळीही आम्ही पक्षाची निष्ठा ठेवली. माझ्यावर अनेक हल्ले झाले, धमक्या आल्या, दहशतीच्या वातावरणात पुन्हा या मतदारसंघात शिवसेना उभी केली. 2009 च्या निवडणुकीत सुनील राऊत यांचा पराभव झाला होता. 2014 मध्ये युती तुटल्यानंतरही मनोज कोटक यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला. भांडुपच्या सर्व लोकांना सोबत घेऊन काम केलं असं त्यांनी सांगितले.
तसेच आज काय परिस्थिती निर्माण झाली इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर चांगले दिवस शिवसेनेला आले. मात्र आलेल्या संधीची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुखांकडून झाला. संपूर्ण सभागृहात मच्छिमारी करणाऱ्या कोळी समाजाचा मी एकमेव प्रतिनिधी होतो. मात्र या समाजालाही डावलण्यात आला. मुंबईतील कोळी समाजाला किंमत नसेल तर मराठी माणसासाठी जन्माला आलेली शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आजची शिवसेना यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पक्षप्रमुखांनी दुर्लक्ष केलं असेल कार्याचं मुल्यमापन करता वेगळं काही तरी मुल्यमापन केलं जात असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे पुन्हा संघटनेचा संकटाला सामोरं जावं लागत असेल असा इशारा अशोक पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, आमची नेमकी काय चूक झाली हे जाणून घेण्यासाठी आम्ही मातोश्रीवर गेले होतो परंतु उद्धव ठाकरेंनी आमची भेट नाकारली. सर्व सामान्य शिवसैनिकाला आता डावलल गेले. त्यामुळे भविष्यात प्रत्येक शिवसैनिक काम करताना या गोष्टी लक्षात ठेवतील. अशी खंत भांडूपचे विद्यमान आमदार अशोक पाटिल यांनी व्यक्त केली आहे.