Join us

Maharashtra Election 2019: ... म्हणून मी मनसे सोडली, नितीन नांदगावकरांनी सांगितलं 'राज'कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 10:31 PM

Maharashtra Election 2019: मनसेस्टाइल खळ्ळ खटॅक आंदोलनांमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते.

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवून देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र, यादरम्यान शिवसेनेने मनसेला मुंबईत जबरदस्त धक्का दिला. धडाकेबाज आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत हाती शिवबंधन बांधले. नितीन नांदगावकरांच्या अचानक शिवसेना एन्ट्रीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या राजकारणाचा उलगडा आता स्वत: नितीन यांनीच केला आहे. 

नितीन नांदगावकरांचा शिवसेना प्रवेश झाल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले होते. तर, अनेकांना हाच प्रश्न पडला होता की, नितीन नांदगावकर शिवसेनेत कशामुळे? विधानसभेची उमेदवारी न दिल्यानेच त्यांनी सेनाप्रवेश केल्याचंही बोललं जात होतं. मात्र, त्यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलंय. ''राज ठाकरे हे दैवत होते, आहेत अन् राहणार. पण, त्या राजसाहेबांना ज्या साहेबांनी शिवसेना सोडली, त्या बडव्यांना घेतलं होतं. मला राजसाहेबांबद्दल काहीच बोलायच नाही, ते दैवतच आहेत. पण, आजूबाजुच्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला,'' असे स्पष्टीकरण नितीन नांदगावकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहे.

मनसेस्टाइल खळ्ळ खटॅक आंदोलनांमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. तसेच त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये अनेकांना न्याय मिळवून दिला होता. हल्लीच त्यांनी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टॅक्सीचालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. अखेरीस त्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देणं हा मोठा धक्का मानला जातो. 

टॅग्स :मनसेशिवसेनाराज ठाकरे