मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढत चालला असून मुख्यमंत्रिपदावर शिवसेना आजही ठाम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहावं असा डावपेच महाराष्ट्रात सुरु आहे. काळजीवाहू म्हणून सूत्र हलवू नये, बहुमत असेल तर सिद्ध करा, घटनेनुसार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्यापासून राज्यात राज्यपाल निर्णय घेतील. सरकार बनविण्याची संधी सर्वात मोठ्या पक्षाला आधी मिळते. शिवसेनेशिवाय सरकार बनविणार नाही असं भाजपा नेते म्हणतात मग लोकसभापूर्वी काय ठरलं होतं त्यावर बोलावं. कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, तथाकथित मध्यस्थांना उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. शिवसेना-भाजपामधील हे प्रकरण त्यात तिसऱ्याने मध्ये पडण्याची गरज नाही अशा शब्दात मध्यस्थी करणाऱ्यांना फटकारलं आहे.
तसेच नितीन गडकरी मुंबईला येत असतात. त्यांचे मुंबईला घर आहे ते येतील. मातोश्रीला जाण्याची बातमी असेल तर गडकरींकडे शिवसेनेला मुख्यमंत्री पद अडीच वर्ष देण्यात येईल असं लिखित पत्र आहे का? उद्धव ठाकरे त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रासाठी अन्यायकारक, राज्यातील जनतेचा अपमान करणारं आहे. आमचे चेहरे काळवंडले नाही, आम्ही हसत आहोत. आम्हाला माहित आहे पुढे काय करायचं आहे असंही संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्रातले सर्व आमदार एकत्र असावे म्हणून ते हॉटेलला राहत आहेत. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात घोडेबाजार होईल का अशी शक्यता असल्याने पंतप्रधानांच्या पारदर्शक कारभाराला महाराष्ट्रात आव्हान देण्यासारखं आहे. महाराष्टात कोणताही पॅटर्न राबवा ते शक्य होणार नाही. आम्ही सगळे एक आहोत. महाराष्ट्र कधीही झुकणार नाही, शरद पवार झुकले नाहीत, उद्धव ठाकरे झुकले नाहीत, न्यायाची लढाई सुरुच राहणार आहे. महाराष्ट्र आमचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत महाराष्ट्र स्वाभिमानाने राहिला आहे असंही संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.
याचसोबत अयोध्या प्रकरणात शिवसेनेचं योगदान कोणीही नाकारु शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वांना मानावा लागेल. महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार राहू नये, कायमस्वरुपी स्थिर सरकार यावं त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांना वाटत असेल तर त्यादृष्टीने हालचाली कराव्या लागतील. ही वेळ ज्यांनी आणली आहे त्यांना महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल. अमित शहांसमोर या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, म्हणून ते हस्तक्षेप करत नाही असंही संजय राऊत यांनी सांगितले आहे.