मुंबई: मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात पक्षाचा आदेश डावलून बंडखोरीचा झेंडा फडकविलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या इच्छुकानी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टी, सेनेसह एकूण 10 उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.
काँग्रेसचे सुफीयान वेणू व शिवसेनेच्या बुलेट पाटील यांची समजूत काढण्यात पक्ष श्रेष्टीना यश आले.त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. याठिकाणी काँग्रेस आघाडीने सपासाठी हा मतदार संघ सोडला आहे.विद्यमान आमदार अबू आझमी विजयाची हॅट्रिक नोंदविन्याच्या सज्ज असताना काँग्रेसचे नगरसेवक वेणू यांनी अर्ज भरला होता.तर शिवसेनेने काँग्रेसमधून 'आयात' झालेल्या विठ्ठल लोकरे यांना तिकीट दिल्याने गेल्या निवडणुकीतील उमेदवार बुलेट पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.मात्र सोमवारी दोघांनी अर्ज मागे घेतले.
तसेच आता महाआघाडीचे आझमी, महायुतीचे लोकरे व वंचित बहुजन आघाडीच्या सुरय्या शेख या प्रमुख उमेदवारात तिरंगी लढत होईल. एकूण 10 उमेदवार व 'नोटा'सह 11 पर्याय मतदान उपलब्ध आहेत.