Join us

Maharashtra Election 2019: दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 5:10 AM

विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग नसल्याने या सुट्टीत बदल करण्याची मागणी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा परिणाम शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांवर होणार असून त्यामुळे आता शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीवरही गदा येणार आहे. विधानसभा निवडणूक मतदानाची तारीख २१ आॅक्टोबर असल्याने शिक्षक २२ आॅक्टोबरपर्यंत निवडणूक कामात व्यस्त असतील. त्यामुळे यंदा दिवाळीची सुट्टी २३ किंवा २४ आॅक्टोबरनंतर लागू करावी, अशी मागणी शिक्षकांकडून शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग नसल्याने या सुट्टीत बदल करण्याची मागणी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.१२ एप्रिल २०१९च्या शिक्षण संचालनालयाच्या पत्राद्वारे २१ आॅक्टोबरपासून शाळांना सुट्टी देण्यात यावी, अशी अधिसूचना करण्यात आली आहे. मात्र २१ आॅक्टोबर रोजी शिक्षण विभागाने या दिवशी सुट्टी देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचे दराडे यांनी सांगितले. २१ व २२ आॅक्टोबर रोजी सुट्टी दिल्यास शिक्षकांना त्यांची दिवाळीची सुट्टी उपभोगताच येणार नाही; मग अशा सुट्टीचा उपयोग काय, असा सवाल शिक्षक करीत आहेत. त्यामुळे दिवाळीची सुट्टी २३ व २४ आॅक्टोबरनंतर देण्याची शिक्षकांची मागणी आहे.दरम्यान, काही शाळांनी वेगवेगळ्या कारणांनी ७६ सुट्ट्यांमधील काही सुट्ट्या कापून घेणे, राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या नाकारणे, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी बोलावणे असे प्रकार सुरू केले असल्याची माहिती दराडे यांनी दिली. यासंदर्भात उपसंचालकांनी संबंधित शाळांना असे प्रकार परस्पर न करता त्यासंबंधित सूचना देण्याचीही मागणी केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शाळा