Join us

मतदानाच्या प्रमाणात दुपारनंतर झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 3:16 AM

Maharashtra Election 2019: वाढलेले मतदान कुणासाठी लाभदायक ठरणार?

मुंबई : मुंबई उपनगरातील वांद्रे पूर्व मतदारसंघात ५०.६५ टक्के मतदान झाले तर २०१४ मध्ये ४७.२० टक्के मतदान झाले होते. या वाढलेल्या मतदानाचा टक्का कुणाच्या पारड्यात पडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बंडखोर आमदार तृप्ती सावंत व काँग्रेसचे जीशान सिद्दिकी यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे. प्रकाश सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या २०१५ च्या पोटनिवडणुकीत ३८.८८ टक्के मतदान झाले होते.

वांद्रे पूर्व हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेला मतदारसंघ असल्याने शिवसैनिकांनी सकाळपासून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. अपक्ष उमेदवार सावंत व काँग्रेसचे सिद्दिकी, एमआयएमचे सलीम कुरैशी यांनी सकाळपासून आपापल्या हक्काच्या मतदारांना मतदान करण्यासाठी कष्ट घेतले. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह दिसून येत नव्हता. दुपारनंतर मतदारांची रांग लागल्याचे चित्र होते.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रामदास आठवले, विश्वनाथ महाडेश्वर, तृप्ती सावंत आदींनी वांद्रे पूर्व येथील नवजीवन शाळेमध्ये मतदान केले. मतदानानंतर महाडेश्वर यांनी विजयाची खात्री असल्याचा दावा केला. तर वांद्र्यातील जनता आपल्या पाठीशी असून आपलाच विजय होणार असल्याचा दावा सावंत यांनी केला. मतदानासाठी आलेल्या ठाकरे व आठवले यांनी या वेळी एकमेकांशी चर्चा केली.

वांद्रे पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार आशिष शेलार, काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी सकाळी मतदान केले. सचिन तेंडुलकर, शाहरूख खान, सलमान खान, आमीर खानसहित अनेक सेलीब्रिटींनी वांद्रे पश्चिममध्ये मतदान केले. सेलीब्रिटींना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला.

तेंडुलकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्यावर एका अधिकाऱ्याने लेदर बॉलवर सचिनची स्वाक्षरी मागितली. या चाहत्याला सचिनने निराश केले नाही व त्याने आणलेल्या लेदर बॉलवर स्वाक्षरी केली. त्यामुळे अधिकारीखूश झाला.

धारावी मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शिवसेनेचे आशिष मोरे व एमआयएमचे मनोज संसारे रिंगणात आहेत. धारावीमध्ये अनेक ठिकाणी सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. कोणतीही मोठी समस्या न उद्भवता मतदान सुरळीत व शांतपणे पार पडल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मतदारांना माहिती देण्यासाठी व मतदान पावती देण्यासाठी अनेक ठिकाणी टेबल लावून बसलेल्या कार्यकर्त्यांची सोय पक्षातर्फे करण्यात आली होती. सकाळी काम सुरू होतानाच त्यांना चहा-नाश्ता देण्यात आला होता. त्यानंतर दुपारी जेवण व त्यानंतर चहाची सोय बसल्या जागी पुरवण्यात आली होती. या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी खास व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदान