Maharashtra Election 2019 : बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 08:25 AM2019-10-18T08:25:35+5:302019-10-18T08:40:02+5:30
वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेण्याचा दबाव झुगारुन लढण्याचा निर्धार ठेवला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बंडखोरी शमविण्यात शिवसेना-भाजपाला काही प्रमाणात यश आलं असलं तरी अद्यापही काही जागांवर बंडखोरी कायम असल्याने त्याचा फटका शिवसेना-भाजपाला बसण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेण्याचा दबाव झुगारुन लढण्याचा निर्धार ठेवला आहे. यानंतर आता शिवसेनेतून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज भरत युतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. तृप्ती सावंत यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. तृप्ती सावंत या निष्ठावंत शिवसैनिक बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत वांद्र पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात तत्कालीन काँग्रेसचे नेते नारायण राणे निवडणूक लढवित होते. मात्र सहानभुतीच्या जोरावर तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला. मात्र आता तृप्ती सावंत यांना निवडणुकीत तिकीट देण्याबाबत शिवसेनेने अनुकुलता दाखविली नाही. त्यांच्या जागेवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देऊन तृप्ती सावंत यांनी उमेदवारी नाकारण्यात आली.
दिवंगत आमदार बाळा सावंत यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असून, शिवसेनेने विधानसभेतील एकमेव महिला आमदाराला तिकीट नाकारून सावंत यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सावंत यांनी 2015 च्या पोटनिवडणुकीत पराभव केला होता, याकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
पोटनिवडणुकीतील मतांची आकडेवारी
2015 च्या पोटनिवडणुकीमध्ये तृप्ती सावंत यांना 52 हजार 711 मते मिळाली व 19 हजार 8 मताधिक्याने त्यांना विजय मिळाला. काँग्रेसच्या नारायण राणे यांना 33 हजार 703 मते मिळाली होती; तर एमआयएमच्या राजा रहबर खान यांना 15 हजार 50 मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार रिंगणात नव्हता.