मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. राजकारणातील उलथापालथ, लोकांना स्वप्ने दाखविण्याची खुबी आणि प्रश्नांनी भांबावलेला सामान्य माणूस यांचे चित्रण विंदांनी केले आहे.
देशामध्ये सर्वांत प्रथम निवडणुका झाल्या, त्या वेळी १९५१/५२ च्या सुमारास विंदांनी ही कविता लिहिली. या कवितेला ६७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. मात्र त्या वेळी जी राजकीय परिस्थिती होती, त्यापेक्षाही ती आज अधिक बरबटलेली आहे.
१७ वर्षांपूर्वी एका कविता वाचनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंतांच्या आणि जाणत्या रसिकांसमोर त्यांनी ही कविता सादर केली होती. प्रस्तावना करताना ते म्हणतात, मी माझी एक भाग्यवान कविता वाचली, तशी माझी एक अत्यंत दुर्दैवी कविता वाचतो. ही कविता भारतात जेव्हा पहिली निवडणूक झाली, आणि मला जे काही दिसलं, निवडणुकीच्या वेळी चाललेलं आणि निवडणुकीनंतर, आणि पूर्वी. म्हणजे आश्वासनं वगैरे. त्या वेळी मी ही कविता लिहिली.
ते म्हणतात, ‘ही कविता दुर्दैवी का? तर एखादी ‘टॉपिकल’ कविता लिहिलेली असते, एखाद्या प्रसंगानंतर ती जुनी झाली पाहिजे आणि विसरलीही गेली पाहिजे. ही कविता काही केल्या मरत नाही. कारण त्यानंतर इतक्या निवडणुका झाल्या, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी ही कविता वाचतो आणि प्रत्येक वेळी ती टोपी अजूनही तशीच लागू पडते. इतक्या पक्षांची इतकी सरकारे आली आणि गेली. तरी सामान्य माणसांचे प्रश्न जागीच राहिले आहेत. ते अजूनही सुटलेले नाहीत. ही कविता काही केल्या मरत नाही. ज्या वेळी मरेल ना, त्या वेळी तो भारताचा भाग्यदिवस.’