मुंबई- राष्ट्रीय पक्षांचे डोळे जेव्हा बंद होतात, तेव्हा ही जनताच अंजन घालते. जागावाटपावेळी आम्ही तडजोड केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 50-50 टक्क्यांचा फॉर्म्युला ठरला होता. विधानसभा जागावाटपाचाही 144-144 ठरला होता. विधानसभेच्या वेळी चंद्रकांतदादांनी काही अडचणी सांगितल्या होत्या, पण भाजपाच्या सगळ्या अडचणी समजून घेऊ शकत नाही. पण मलाही पक्ष चालवायचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला एक प्रकारचा इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपण्याची शक्यता आहे. पुढे ते म्हणाले, हा जनादेश सर्वच पक्षांचे डोळे उघडणारा आहे. आम्ही निर्णय घेऊन सरकार स्थापनेचा विचार करू. चांगलं सरकार स्थापन करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. सत्तेची हाव माझ्या डोक्यात नाही. वांद्र्याच्या जागेसारखीच परळीची जागा होती, त्यामुळे या पराभवाबद्दल मला खेद आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. फॉर्मुल्यावर निर्णय झाल्यावरच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
आता सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेनेची मदत घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही लोकसभेच्या वेळी ठरलेल्या 50-50च्या फॉर्म्युल्यावर पुढे जाण्याचं ठरवलं असल्याचं सांगितल्यानं आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.