मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून भाजपाने सत्तास्थापन करण्यात असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्रिपदावर ठाम असणारी शिवसेना एनडीएतून बाहेर पडत नाही तोवर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकत नाही असं आघाडीने सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत आज मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.
याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद घेणार आहे अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्यातील सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्रात महाशिवआघाडी असं नवीन समीकरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना राज्यात सत्तास्थापन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आज दिल्लीत असून शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट घेतील. याभेटीनंतर राज्यातील नवीन समीकरण उदयास येऊ शकतं. रविवारी उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली होती. त्यात आमदारांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी तुमचा आणि पक्षाचा फायदा होईल, असा निर्णय घेईन. युतीमध्ये शिवसेनेचे नेहमीच नुकसान झाले. फायद्याच्या वेळी भाजपने आपल्याशी चांगले संबंध ठेवले आणि गरज नाही, तेव्हा आपल्याला अपमानित केले. अहंकारी मित्रच आज आपल्याशी शत्रूसारखे वागत आहे. अशा वेळी आपण काय करायचे? त्यांना वठणीवर आणायचे असेल, तर पर्यायाचा विचार करावाच लागेल. कालपर्यंत आम्ही पालखीचे भोई होतो, आता आम्हाला या पालखीत मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिकालाच बसवायचे आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला होता. त्यामुळे शिवसेना राज्यात सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.