मुंबई - गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत होते तेव्हा कोणत्या बिळात लपून बसला होता, अल्पेश ठाकोरबाबत तुम्ही मौन बाळगून होता. आज अल्पेशला पक्षात घेऊन सन्मान केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमात येऊन भूमिका स्पष्ट केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक उत्तर भारतीयांना मदत केली, एका आईला तिचं बाळ परत मिळवून देण्यासाठी मनसेच्या अविनाश जाधव यांनी पुढाकार घेतला, मनसेची भूमिका महाराष्ट्र हिताची आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढे पैसे मिळतात तेवढचं बोलावं असा इशारा उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी भाजपा नेते मनोज तिवारी यांना दिला आहे.
याबाबत बोलताना विनय दुबे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी मनसे बोलत असते, आज मुंबई शांत असताना अशाप्रकारे वक्तव्य करुन वातावरण खराब का करताय? राज ठाकरेंबद्दल तुम्हाला इतका राग असेल तर सुरक्षा सोडून एकदा फिरून दाखवा, तुमच्या अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडवलं जात आहे. भाजपाने काय केले हे सांगावं असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणुकीत आला असेल तर मतं मागा, भाजपाने एवढचं काम उत्तर प्रदेशात केले असतं तर लोकांना मुंबईत येण्याची गरज नसती पडली. तुम्हाला कोणी बूट फेकून मारलं किंवा थप्पड मारली तर आमचाही अपमान होईल. पण जे काम आहे तेच कराव, जनता आणि राजकारणात रस असेल म्हणून काहीही वक्तव्य करुन दोन समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करु नका, भाजपाचे सुरेश धस यांनी बिहारी लोकांबद्दल केलेले वक्तव्य त्याला जाब विचारा, गुजरातमधून उत्तर भारतीयांना हाकलवलं त्या अल्पेश ठाकोरला जाब विचारा असाही टोला विनय दुबे यांनी लगावला आहे.
दोन दिवसांपूर्वी ऐरोली सेक्टर १७ मध्ये भाजपच्या वतीने हिंदी भाषिकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये हिंदी भाषक कलाकार खासदार मनोज तिवारी यांनी प्रांतवादाचे राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. यापूर्वी मुंबई, ठाणे व नवी मुंबईमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यात आले. त्यांना मारहाण करण्यात आली. प्रांतवादाचे राजकारण करणाऱ्या पक्षांनी उत्तर भारतीय नागरिकांचे ठेले तोडले, त्यांच्या गाड्यांचे नुकसान केले. तेव्हा मी फक्त कलाकार होतो. त्या वेळी रोडवर उतरून या हल्ल्यांचा विरोध केला होता. त्या अडचणीच्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी सहकार्य केले होते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या काही नेत्यांनीही मदत केली होती, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले होते.