Maharashtra Election 2019: मुंबई उपनगर जिल्ह्यात विक्रोळीत सर्वाधिक; वांद्रेत सर्वांत कमी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:29 AM2019-10-22T05:29:18+5:302019-10-22T06:32:21+5:30
Maharashtra Election 2019: मतदान वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करूनही मतदानाचा टक्का वाढला नाही, उलट २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हा टक्का घसरला आहे.
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ५०.१९ टक्के मतदान विक्रोळी मतदारसंघात झाले. तर सर्वांत कमी मतदान हे वांद्रे (पूर्व) (३३.१९ टक्के) मतदारसंघात झाले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ४५.४८ टक्के मतदान झाले. मतदान वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करूनही मतदानाचा टक्का वाढला नाही, उलट २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हा टक्का घसरला आहे.
मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा असणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांतील एकूण ३३ लाख ३ हजार ०८३ (४५.४८%) मतदारांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान केले. जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया ही पारदर्शकपणे, निष्पक्षपणे, कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यात ५१.०१ टक्के मतदान झाले होते; तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यामध्ये वाढ होऊन ५६.२३ टक्के मतदान झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हा कल कायम राहील व मतदानाची टक्केवारी वाढेल असा अंदाज होता, मात्र सर्व अंदाज चुकवत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ५०.१६ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये वाढ होण्याऐवजी घट झाली.
सेलिब्रिटींसह नेत्यांचे मतदान
मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांंद्रे, अंधेरी यासह विविध भागांतील सेलिब्रिटींनी मतदानात भाग घेतला. माजी राज्यपाल राम नाईक, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अभिनेता व भाजपचे खासदार रवी किशन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री शुभा खोटे, टेनिसपटू महेश भूपती, अभिनेत्री लारा दत्ता, शाहरूख खान, अमीर खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, शबाना आझमी, जावेद अख्तर, अनिल कपूर, ऋत्विक रोशन, प्रेम चोप्रा, गुलजार, गोविंदा व इतरांनी मतदान केले. जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मतदार सदिच्छा दूत असलेल्या अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनीदेखील उपनगर जिल्ह्यात मतदान केले.