Maharashtra Election 2019 : मतदारांना हवा ‘ग्रीन मेनिफेस्टो’; प्रदूषणविरोधी कृती कठोर करण्याची राजकीय पक्षांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:03 AM2019-10-09T04:03:12+5:302019-10-09T04:10:06+5:30

महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रदूषित राज्य असून, पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या १०२ नॉन-अटेनमेंट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे.

Maharashtra Election 2019: Voters want 'green manifesto'; Demand for political parties to tighten anti-pollution action | Maharashtra Election 2019 : मतदारांना हवा ‘ग्रीन मेनिफेस्टो’; प्रदूषणविरोधी कृती कठोर करण्याची राजकीय पक्षांकडे मागणी

Maharashtra Election 2019 : मतदारांना हवा ‘ग्रीन मेनिफेस्टो’; प्रदूषणविरोधी कृती कठोर करण्याची राजकीय पक्षांकडे मागणी

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : हवा स्वच्छ राखण्यावर सर्व राजकीय पक्षांनी भर द्यावा, असे आवाहन नागरी समाज तसेच नागरिकांच्या नेतृत्वाखालील गटांनी केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भाजप, काँग्रेस व आप या पक्षांनी हवेच्या प्रदूषणाची दखल घेतली होती. हवामान बदलाची समस्या हाताळण्यासाठी उपाययोजनांचा समावेश लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात केला होता. आता विधानसभा निवडणुकीदरम्यानही राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात स्वच्छ हवेला प्राधान्य द्यावे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर कृती करावी, अशी मागणी मतदारांकडून होत आहे.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रदूषित राज्य असून, पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या १०२ नॉन-अटेनमेंट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. या यादीत नंतर काही बदल केल्यामुळे अशा शहरांची संख्या १२२ झाली. महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांची संख्याही १८ झाली आहे. या यादीत ठाणे शहर नंतर समाविष्ट करण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, पुणे, बदलापूर, उल्हासनगर शहरांमध्ये नायट्रोजन डायॉक्साइडचे प्रमाण धोकादायकरीत्या अधिक आहे. विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर ही सर्वाधिक प्रदूषक शहरे आहेत.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र समितीकडे बालहक्कांसाठी याचिका दाखल करणाऱ्या १६ मुलांपैकी एक रिधिमा पांडे हिने सांगितले की, मी जागतिक तापमानवाढीसह भविष्यकाळाचा विचार करते; तेव्हा मी खूप निराश होते. कारण मी एका निरोगी दीर्घायुष्याची कल्पनाच करू शकत नाही. कोणालाच त्रास सहन करावा लागू नये, असे मला व्यक्तिश: वाटते. मला एक निरोगी भवितव्य हवे आहे. स्वच्छ हवेच्या हक्काचा यात समावेश आहे. हीच सर्वसामान्य नागरिकांचीही मागणी आहे, असे ती म्हणाली.
वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभट यांनी एक आॅनलाइन याचिका केली असून, यात भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना पर्यावरणपूरक जाहीरनामा (ग्रीन मेनिफेस्टो) प्रसिद्ध करण्यासाठी आवाहन केले आहे.

राज्यावर बसलेला सर्वाधिक प्रदूषित राज्याचा ठपका आपली वाढ खुंटवून टाकेल. आपण हा कलंक लवकर दूर केला नाही तर आपल्या राज्यातील पर्यटनावर व एकंदर राज्यावर त्याचा परिणाम होईल.
- भगवान केशभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन
प्रत्येकाला वायुप्रदूषणाच्या संकटापासून वाचवणे आवश्यक आहे. भारतभर आपल्याला वर्षाचे सर्व दिवस स्वच्छ हवा मिळेल याची काळजी घेतली गेली पाहिजे.
- देबी गोएंका, कार्यकारी विश्वस्त, कन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट

वायुप्रदूषणामुळे दगावणाऱ्यांची संख्या तंबाखू सेवनामुळे दगावणाºयांच्या संख्येहून अधिक आहे. प्रदूषित हवेचे घातक परिणाम सर्वाधिक प्रमाणात लहान मुलांवर होतात. भारताच्या निरोगी भवितव्याला असलेला हा सर्वात मोठा धोका आहे. सर्व राजकीय पक्षांनी हे संकट दूर करण्यास प्राधान्य द्यावे.
- निखिल कमलेघ,
स्वयंसेवक, फ्रायडेज फॉर फ्युचर

Web Title: Maharashtra Election 2019: Voters want 'green manifesto'; Demand for political parties to tighten anti-pollution action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.