Maharashtra Election 2019: मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:25 AM2019-10-22T05:25:23+5:302019-10-22T06:32:43+5:30

Maharashtra Election 2019: मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघांत सोमवारी मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली.

Maharashtra Election 2019: Voting the percentage fell in Mumbai city, suburban district | Maharashtra Election 2019: मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला

Maharashtra Election 2019: मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला

Next

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघांत सोमवारी मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. प्राथमिक अंदाजानुसार ५० टक्के मतदान झाले असून, मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मुंबई शहर, उपनगरात मतांचा टक्का घसरला आहे.

मागील वर्षी मुंंबई शहर जिल्ह्यात ५२ टक्के मतदान झाले होते. मुंबईत भांडुप पश्चिमेत सर्वाधिक तर कुलाबा येथे सर्वात कमी मतदान झाले.२०१४च्या लोकसभा निवडणुकांपासून सातत्याने वाढणारी मतदानाच्या टक्केवारीने यंदा उलटे वळण घेत २००९ आणि त्यापूर्वीची स्थिती गाठली आहे.

शहर जिल्ह्यातील २,५९२ मतदान केंद्रांत सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. एरवी सकाळच्या सत्रात दिसणारी गर्दी यंदा दिसली नाही. पहिल्या दोन तासांत अवघे पाच टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत हीच स्थिती होती. त्यानंतर केंद्रांवरील गर्दी वाढली. संध्याकाळच्या सत्रात राजकीय कार्यकर्त्यांनी हक्काच्या मतदारांना घराबाहेर काढण्याची कवायत केल्याने काही प्रमाणात मतांचा टक्का वाढला.

वरळी आणि माहिम विधानसभांचा अपवाद वगळता, अन्यत्र राजकीय कार्यकर्त्यांतही फारसा उत्साह दिसला नाही. वरळीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिक उत्साहाने मैदानात उतरले होते. इतर भागांतील शिवसैनिकही वरळीत हिंडत होते. वरळीत काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.

वरळीतील मतांच्या टक्केवारीने पन्नासचा आकडा ओलांडला. माहिम मतदार संघात शिवसैनिक, मनसैनिक आपापल्या मतदारांसाठी जोर लावत होते. माहिममधील विविध मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. माहिममध्ये साधारण ४७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मलबार हिल, शिवडीत आपला मतदार मतदानासाठी बाहेर पडेल, यासाठी भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांनी विशेष काळजी घेतल्याचे दिसत होते. दुपारनंतर या दोन्ही मतदार संघांतील मतादानाचे प्रमाण वाढले. मलबार हिल येथे ४७ तर शिवडीत साधारण ५० टक्के मतदान झाले.

सर्वात कमी ३७ टक्के कुलाबा येथे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उच्चभ्रू वस्त्या, सर्व सनदी अधिकारी आणि उद्योजकांच्या या मतदार संघात मतांचा टक्का फारसा वाढत नाही. सकाळी काही प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची तुरळक गर्दी दिसली खरी, परंतु दुपारनंतर येथील अनेक मतदान केंद्रांवर एकच शुकशुकाट पसरल्याने कार्यकर्त्यांनी धावपळ सुरू झाली. काहीसा असाच प्रकार मुंबादेवीत पाहायला मिळाला, परंतु दुपारच्या सत्रात येथे मतदारांनी गर्दी केली होती. भायखळा मतदारसंघात सकाळपासून मतदारांची गर्दी होती.
भायखळा येथील घोडपदेव, माझगाव, नारळवाडीसारख्या परिसरात मोठ्या संख्येने मुस्लीम मतदार बाहेर पडले.

भायखळ्यात साधारण ४७ टक्के मतदान झाले. तुलनेत धारावी, सायन-कोळीवाडा आणि वडाळा मतदारसंघात मतदारांनी गर्दी केली होती. मुंबई शहर जिल्ह्याचा आढावा घेतल्यास प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील सायनमध्ये सर्वाधिक ५१ टक्के मतदान झाले. धारावीत ४८ तर वडाळ्यातील मतदानाचा टक्का ४९ इतका राहिला.

व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बंद होण्याच्या काही मोजक्या घटना झाल्या. मतदानाच्या दरम्यान वरळीसह सर्व मतदार संघांत अठरा बॅलेट युनिट, अठरा कंट्रोल युनिट, शंभर व्हीव्हीपॅट बदलण्यात आले होते. तेथे तातडीने नवीन मशीन देण्यात आल्या. त्यानंतर, मतदान सुरळीत सुरू झाले. मतदान प्रक्रियेत कोठेही अडथळा निर्माण झाला नाही.

केंद्राबाहेरील सगळेच समान

मतदान केंद्रांबाहेर राजकीय पक्षांकडून टेबल लावले जातात. मतदारांना स्लिप अन्य माहिती इथे दिली जाते. अनेक ठिकाणी येथील कार्यकर्ते हमरीतुमरीवर येतात.

यंदा या टेबलवरील बॅनर, झेंड्यांना निवडणूक आयोगाने हद्दपार केले होते. त्यामुळे काही ठिकाणी मतदारांना कोणत्या पक्षाचा टेबल हे ओळखण्यात अडचणी आल्या. त्यातल्या त्यात शिवसैनिकांच्या हातातील शिवबंधनच ओळखीची खूण ठरली.

Web Title: Maharashtra Election 2019: Voting the percentage fell in Mumbai city, suburban district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.