मुंबई : पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा आणि त्यामुळे आरबीआयने त्यांच्यावर लादलेले निर्बंध यामुळे खातेदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत. यामुळे नाराज खातेदारांपैकी काहींनी ‘नोटा’चा पर्याय निवडल्याचे सांगितले. तर, काहींनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र मुलुंडमध्ये दिसून आले. मुलुंडमधील मतदानाच्या एकंदर टक्केवारीवरही याचा परिणाम दिसून आला.
बँक घोटाळ्यामुळे ओशिवरातील संजय गुलाटीपाठोपाठ मुलुंडमध्ये भट्टोमल पंजाबी, मुरलीधर धर्रा यांच्या मृत्यूमुळे मुलुंडसह मुंबईतील बँक खातेदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा मुलगादेखील पीएमसी बँकेच्या माजी संचालक मंडळामध्ये असल्यामुळे मुलुंडमध्ये बँक खातेदारांद्वारे आंदोलन सुरू होते. खातेदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाहोता.
कॉलनीतील काही खातेदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला, तर काहींनी मतदानावरच बहिष्कार टाकला. खातेदार जगदिश सिंह यांनी सांगितले की, आरबीआय खातेदारांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. महिना झाला, आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. म्हणून यंदा ‘नोटा’चा पर्याय निवडला. आमच्यासाठी यंदाची दिवाळी ही ‘काळी दिवाळी’ असेल, असेही ते म्हणाले.
म्हणून टाकला बहिष्कार
बँकेचे खातेदार बोनीलाल यांनी सांगितले की, मुलुंडच्या शाखेतच १५ हजार खातेदार आहेत. त्यात, कुटुंबीय वेगळेच. आम्ही आजच पैसे द्या, असे म्हटले नाही़ किमान आम्हाला लिखित स्वरूपात पैसे मिळणार याचे आश्वासन द्या, अशी आमची मागणी होती. त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. कुठल्याच पक्षाने मदत न केल्यामुळे मी ‘नोटा’ला प्राधान्य दिले. तर, काहींनी मतदानावरच बहिष्कार टाकला आहे.