Join us

Maharashtra Election 2019: मुंबईच्या विकासाचं मॉडेल महाराष्ट्रात न्यायचंय- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:34 PM

मुंबईसारखी आरोग्य यंत्रणा राज्यभरात उभारणार

मुंबई : मुंबई महापालिकेने आरोग्य, शाळा ,वाहतूक आदी विभागांमध्ये भरीव कामगिरी केली असून मुंबईच्या विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात न्यायचे असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. ते कुर्ला विधानसभेतील महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सुषम सावंत, उमेदवार मंगेश कुडाळकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, मी सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. ११८ मतदारसंघांना भेटी दिल्या आहेत. प्रत्येक गल्लीत जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सर्व ठिकाणी केवळ भगवं वातावरण दिसत आहे. आघाडी सरकारच्या काळात कोणताही विकास झाला नाही. त्यांनी जे पाप केलं, ते पुसण्यात युतीची ५ वर्ष गेली. पुढील पाच वर्षात महाराष्ट्र घडवायचा असून मुंबईचे विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात न्यायचे आहे. ते पुढे म्हणाले की, मुंबईत महापालिकेची सर्वात सुसज्ज रुग्णालये आहेत. १७५०० बेड आहेत , इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही शहरात बेड नाही. तिथे चांगल्या पद्धतीचे उपचार मिळतात. त्याचा नागरिकांना फायदा मिळतो. मात्र ग्रामीण भागात या प्रकारचे उपचार मिळत नाही. त्यांना मुंबईला यावे लागते. संपूर्ण महाराष्ट्रात या दर्जाची आरोग्यसेवा मिळायला हवी असे ते म्हणाले. तर पालिकेने बेस्ट बसच्या तिकिटाचे दर कमी केले. त्यामुळे नागरिकांचा प्रवास स्वस्त झाला. पण बसमध्ये मोठी गर्दी  होत आहे आता बेस्टच्या ताफ्यात ३७०० बस  असून येत्या काळात आणखी ३००० बस आणण्यात येणार असून त्यांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात सकाळी एकदाच बस येते, ती बस चुकली तर मुलांना शाळेत, कॉलेजमध्ये जाता येत नाही. त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्यांनाही मुंबईप्रमाणे बसची सुविधा मिळायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. ज्यांना काम सुरू होण्याच्या आधीच मनात प्रश्न आहेत, त्यांच्यात काम करण्याची धमक नाही, त्यांनी प्रश्न विचारू नये. आम्ही १० जेवणाचे आश्वासन दिले तर ते पूर्णपण करून दाखवू असे त्यांनी आघाडीच्या नेत्यांना सुनावले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरेआरोग्य