मुंबई - शिवसेना हा पक्ष ठाकरे कुटुंबाचा पक्ष आहे. नवीन पिढीने राजकारणात यावं हे स्वत: ठरवितात. राजकारणात येणं गैर नाही, नवीन पिढी स्वत: विचार करत असते. आदित्य हा माझ्या मुलाच्या वयाचा आहे. वरळी व्हिजन त्याने आणलं मग वास्तविक त्यांच्या हातात २०-२५ वर्षे मुंबई महापालिका आहे. आज मुंबईची काय अवस्था आहे ती पाहावी. वाहतूक व्यवस्था बिघडली, राज्यात त्यांचे सरकार, केंद्रात त्यांचे सरकार मग म्हणावं तसं काम केलं नाही अशा शब्दात अजित पवारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार ऐकायला लोक स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत होते मात्र आता ती परिस्थिती नाही. महाराष्ट्रात पैसे न देऊन कोणाच्या सभेला गर्दी करत असतील तर ते राज ठाकरे, शरद पवार, अलीकडे अमोल कोल्हे, अमोल मेटकरी अशी तरुण मंडळींना ऐकण्यासाठीही गर्दी होत आहे. आता सभा लोकं लाईव्हच्या माध्यमातून पाहतात असं त्यांनी सांगितले.
तसेच महाआघाडीत आम्ही सम्यंजस भूमिका घेतली, विरोधी मतांमध्ये फूट पडली तर भाजपा-शिवसेनेला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून काही ठिकाणी आम्ही अपक्ष उमेदवार सक्षम आहे तिथे त्यांना पाठिंबा घेण्याची भूमिका आम्ही घेतली असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.