शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडला. युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर 10 रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल, असे आश्वासन दिलंय. उद्धव ठाकरेंच्या या आश्वासनाचा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. तसेच, उद्धव ठाकरेंना थेट प्रश्नही अजित पवारांनी विचारला.
उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यामध्ये गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी देण्याचं वचन दिलंय. तसेच, महिलांच्या सुरक्षिततेसाठी बससेवा सुरू केली जाईल. 300 युनिटपर्यंतचा वीजदर 30 टक्के कमी केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले तसेच धनगर समाजालाही मिळवून देणार. या देशाचे मुसलमान जरी आमच्यासोबत आले तरी आम्ही त्यांना न्याय-हक्क मिळवून देऊ, असे सांगत पहिल्यांदाच मुस्लिमांना चुचकारले. सत्ता आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. उद्धव ठाकरेंच्या या घोषणांवरुन अजित पवारांनी महायुतीला लक्ष्य केलं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी गेल्या 5 वर्ष काय झोपा काढल्या का? असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
गेल्या 5 वर्षात 10 रुपयांत का थाळी दिली नाही. गेल्या 5 वर्षात का कर्जमाफी दिली नाही. दोन्ही पक्षांचे मंत्री सरकारमध्ये होते, त्यांचंच सरकार होतं. पण, आजही महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली, त्यावरुनही अजित पवार यांनी सरकारवर टीका केली.