- यदु जोशीमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न केले बऱ्याच ठिकाणी त्यांना यशही आले; पण काही ठिकाणी भाजप-शिवसेनेच्या बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्याने युतीची डोकेदुखी वाढली.
सूत्रांनी सांगितले की, भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एक यादी पाठविली. त्यात शिवसेनेचे बंडखोर कुठेकुठे भाजपविरुद्ध उभे आहेत हे नमूद आहे, तर मातोश्रीवरुनही एक यादी घेऊन उद्योगमंत्री व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर बंडखोरांना शमविण्याची मोहीम वर्षा, मातोश्री येथून सुरू झाली. सर्व बाजूने समजूत काढण्याचे प्रयत्नही झाले. काही स्थानिक नेत्यांना सांगून बंडखोरांना शांत करण्यास सांगितले गेले.
‘तुम्हीच आम्हाला मतदारसंघात तयारी करायला सांगितली, त्यानुसार गेली दोन वर्षे झोकून देऊन काम करीत होतो. आता माघार घ्यायला का सांगताय असे उत्तर बंडखोरांनी दिले. विद्यमान आमदार असताना चांगली कामगिरी असूनही आम्हाला संधी का नाकारली. यावेळी लोकांकडून मोठा दबाव आहे, त्यामुळे माफ करा, माघार घेऊ शकत नाही, असे काहींनी नेतृत्वाला सांगितले.त्यांची ताकद कमी करणे हाच उपायजवळपास ११४ मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेचे बंडखोर उभे होते. फडणवीस, ठाकरे, पाटील यांनी एकेकाशी बोलून बंडखोरांची संख्या निम्म्याहून अधिक कमी केली. मात्र, सूत्रांनी सांगितले की, गंभीरपणे दखल घेण्याजोगे महत्त्वाचे बंडखोर उमेदवार जवळपास ३0 मतदारसंघांमध्ये अजूनही कायम राहिले. त्यांना शमविण्यात दोन्ही बाजूंच्या नेत्यांना यश आले नाही. आता बंडखोरांची ताकद कमी करणे हा एकच उपाय दोन्ही पक्षांकडे उरला आहे. काही ठिकाणी सेना बंडखोर कायम असल्याने इतरत्र भाजप बंडखोर रिंगणात आहेत.