मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा, शिवसेना शिंदे गट, मनसे यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांच्यासह इतर पक्षातून प्रवेश घेतलेल्या नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत मुंबईतील ३६ जागांपैकी सर्वाधिक जागा उद्धव ठाकरे गट लढवणार असल्याचं चित्र आहे. त्यात पहिल्या यादीत १३ जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईतील 'या' जागांवर ठाकरेंचे शिलेदार
मागाठाणे - उदेश पाटेकरविक्रोळी - सुनील राऊतभाडुंप पश्चिम - रमेश कोपरगावकरजोगेश्वरी पूर्व - बाळा नरदिंडोशी - सुनील प्रभूगोरेगाव - समीर देसाईअंधेरी पूर्व - ऋतुजा लटकेचेंबूर - प्रकाश फातर्पेकरकुर्ला - प्रविणा मोरजकरकलिना - संजय पोतनीसवांद्रे पूर्व - वरूण सरदेसाईमाहिम - महेश सावंतवरळी - आदित्य ठाकरे
शिवडी, भायखळा मतदारसंघात वेट अँन्ड वॉच
गेल्या निवडणुकीत १५ जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. त्यात शिवडी येथे अजय चौधरी तर भायखळ्यात यामिनी जाधव या निवडून आल्या होत्या. शिवसेना फुटीमुळे यामिनी जाधव या एकनाथ शिंदेंसोबत गेल्या. तर शिवडी मतदारसंघात अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे इच्छुक आहेत. अजय चौधरी गेली २ टर्म शिवडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. मात्र यावेळी शिवडी, भायखळा मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आली नाही.
वांद्रे पूर्व जागा ठाकरेंकडे
गेल्या निवडणुकीत वांद्रे पूर्व जागेवर काँग्रेसचे झीशान सिद्दीकी हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र झीशान सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असल्याने काँग्रेसकडून त्यांचं निलंबन करण्यात आले. मविआत ही जागा काँग्रेसनं ठाकरेसेनेला सोडली आहे. या जागेवरून उद्धव ठाकरे यांनी युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे.