मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 04:41 PM2024-10-20T16:41:06+5:302024-10-20T16:48:31+5:30
मुंबईतल्या ३६ पैकी १६ जागांवर मागील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आले होते, यंदा भाजपाने पहिल्या उमेदवार यादीत मुंबईतील १४ जागांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर सर्वांचं लक्ष उमेदवारांच्या यादीकडे लागले होते. त्यात महायुतीत भाजपाने बाजी मारत ९९ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक समितीने या ९९ जणांना निवडणुकीची संधी दिली आहे. या यादीत मुंबईतल्या १४ जागांवरही भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केलेत. त्यात ३ विद्यमान आमदारांना अद्याप प्रतिक्षेत ठेवण्यात आलं आहे. तर आशिष शेलार आणि विनोद शेलार या दोन्ही बंधूंना भाजपानं निवडणुकीत संधी दिली आहे.
मुंबईतल्या या १४ जागांवरील उमेदवार कोण?
दहिसर - मनीषा चौधरी
मुलुंड - मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
चारकोप - योगेश सागर
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम
विलेपार्ले - पराग आळवणी
घाटकोपर पश्चिम - राम कदम
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिल सेल्वन
वडाळा - कालिदास कोळंबकर
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
कुलाबा - राहुल नार्वेकर
या आमदारांसाठी वेट अँन्ड वॉच
भाजपाच्या पहिल्या यादीत बोरिवली येथील आमदार सुनील राणे, वर्सोवा येथील भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्व येथील पराग शाह या ३ विद्यमान आमदारांना प्रतिक्षेत ठेवले आहे. बोरिवली येथे भाजपाने खासदारकीचं तिकिट कापलेले गोपाळ शेट्टी हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल यांच्यासाठी गोपाळ शेट्टी यांचं तिकिट कापण्यात आलं होते. त्यामुळे बोरिवली विधानसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांना भाजपा तिकीट देऊ शकते असं बोललं जाते.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने होने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। (2/2) pic.twitter.com/8MfB5A94Ei
— BJP (@BJP4India) October 20, 2024
घाटकोपर पूर्व येथे मागील निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले प्रकाश मेहता यांचं नाव आघाडीवर आहे. प्रकाश मेहता हे माजी मंत्री आहेत, परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली होती. आता घाटकोपर पूर्व येथील पराग शाह यांच्याऐवजी प्रकाश मेहतांच्या नावाची चर्चा आहे. तर वर्सोवा येथील भारती लव्हेकर यांचीही उमेदवारी धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील या जागांवर भाजपा कुणाला संधी देतं ते पाहणे गरजेचे आहे.