मुंबई - विधानसभा निवणडणुकीत अनपेक्षित घसरण झाल्याने भाजपाला धक्का बसला आहे. दरम्यान, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने खेळी करण्यास सुरुवात केली आहे, तसेच शिवसेनेनेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत भाजपाला सूचक इशारे देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण करून देत शिवसेना पक्षप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं जे ठरलं आहे, त्यानुसार होईल, असे उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीचे कल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. यावेळी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री म्हणाले की, ''राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. तसेच सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत म्हणायचे तर आमचं जे ठरलं आहे त्यानुसार सारं काही होईल.'' विधानसभेच्या निकालात महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीचे विश्लेषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सांगितले की, ''राज्यात महायुतीच्या उमेदवारांविरोधात दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. मात्र या बंडखोरांपैकी काही जण निवडून आले आहेत. पैकी १५ जणांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. तसेच अजून काही बंडखोर महायुतीसोबत येतील अशी अपेक्षा आहे.'' त्यामुळे महायुती भक्कम संख्याबळासह राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राज्यातील सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंचा झालेला पराभव हा पक्षासाठी धक्कादायक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच आमचे इतर काही मंत्रीसुद्धा पराभूत झाले आहेत, या पराभवाचे आम्ही विश्लेषण करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार का?; मुख्यमंत्रीही म्हणाले, आमचं ठरलंय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 6:50 PM