Maharashtra CM: अजित पवारांनी आम्हाला फसवून राजभवनावर नेले! राजेंद्र शिंगणे यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 04:53 AM2019-11-24T04:53:53+5:302019-11-24T04:54:25+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यांच्यासोबत गेलेले काही आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. आम्हाला फसवूनच राजभवनावर नेले गेले, असा गौप्यस्फोट आ. राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत आ. शिंगणे यांनी सांगितलेला वृतांत त्यांच्याच शब्दात असा- आम्हाला रात्री बारा वाजता अजितदादांचा फोन आला की, ‘सकाळी सात वाजता महत्वाची मिटींग आहे. धनंजय मुंडे यांच्या बी ४ या बंगल्यावर पोहोचा’. म्हणून मी सकाळी सात वाजता तेथे पोहोचलो. माझ्यासारखेच आणखी काही आमदार तिथे आले होते. मात्र बंगल्यावर अजितदादा नव्हते. आम्ही काही काळ वाट पाहिली. तेवढ्यात दोन कार्यकर्ते आले. त्यांच्याकडे दोन गाड्या होत्या. त्यांनी आम्हाला सांगितले की, दादांनी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बसून बोलायला सांगितले आहे. तुम्ही चला, असे म्हणून त्यांनी आम्हाला दोन गाड्यांमधून राजभवनाकडे नेले. राजभवन मध्ये गेल्यानंतर आम्ही एका हॉलमध्ये बसलो. थोड्यावेळात तेथे भाजपचे नेते गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आले. पाठोपाठ अजितदादाही तेथे आले. काही वेळातच देवेन्द्र फडणवीस आणि राज्यपाल आले. त्याचवेळी आम्हाला काहीतरी वेगळे होत असल्याचे जाणवले. आम्ही काही विचारण्यासाठी उठणार तेवढ्यात तर राष्ट्रगीत सुरू झाले. लगेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी झाला. त्यामुळे आम्ही काहीच विचारू शकलो नाही. त्यानंतर मी ताबडतोब शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरी पोहोचलो. त्यांना सगळा प्रकार सांगितला. माझ्या पाठोपाठ आणखी काही आमदार तेथे आले. नंतर आम्ही तेथून पवार साहेबांची चर्चा करून वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आलो. मला फसवून तेथे नेले गेले. मला कसलीही माहिती नव्हती. मी राष्ट्रवादी पक्षासोबत आणि पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सोबत आहे.