विशेष प्रतिनिधीमुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी प्रचंड मोठा भूकंप झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असे चित्र असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची राजभवनावर शपथ घेत जबर धक्का दिला.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तीन पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्रित आल्याचे चित्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत असताना फडणवीस-पवार यांच्या शपथविधीची दृश्ये शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास झळकली आणि राज्याच्या राजकारणाला फार मोठी कलाटणी मिळाल्याचे स्पष्ट झाले. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांना कोणतीही मुदत सध्या तरी दिलेली नाही.भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, फडणवीस यांचे कुटुंबीय, अजित पवार यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीच्या १३ आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला. रात्रभरात धक्कादायक घडामोडी घडल्या. मध्यरात्रीपर्यंत शिवसेना-काँग्रेस नेत्यांसोबत बैठकांमध्ये असलेले राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकविले आणि ते उपमुख्यमंत्री झाले. महाशिवआघाडीचे शिल्पकार मानले जाणारे शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यानिमित्ताने पवार कुटुंबातील कलहदेखील समोर आला.मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटद्वारे अभिनंदन केले. पवार यांच्या सोबतीने आपण राज्याला स्थिर सरकार देऊ, असे फडणवीस म्हणाले. राज्याला स्थिर सरकारची गरज होती, त्यासाठी आपण फडणवीस यांच्या सोबतीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. बाकी मी योग्य वेळी बोलेन, अशी प्रतिक्रिया अजितपवार यांनी शपथविधीनंतर दिली. पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी गेले काही दिवस सातत्याने संपर्क राखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी आॅपरेशन केले अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देत त्यांनी मुख्यमंत्रिपद खेचून आणले. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत सोबत येणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर या आॅपरेशनला सुरुवात झाली.कसे सिद्ध करणार बहुमतभाजपकडे १०५ आमदार आहेत. त्यांना १४ अपक्षांचा पाठिंबा आहे. शिवसेनेसोबत असलेल्या सातपैकी तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आपल्याला मिळेल, असा भाजपचा दावा आहे. ते खरे ठरले तर हे संख्याबळ १२२ होईल. तरीही भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी २३ आमदारांची आवश्यकता असेल. अजित पवार यांच्या नेतृत्वात किती आमदार फुटतील यावर अवलंबून असेल.स्थिर सरकार देऊ - फडणवीसअजित पवार यांच्या सोबतीने आपण राज्याला स्थिरसरकार देऊ, अशी ग्वाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमचा एकमित्र सोबत नसल्याची खंत आहे, असे ते शिवसेनेचे नाव न घेता म्हणाले.आमची बांधिलकी राज्यातील जनतेशी आहे. जनतेच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थिर सरकार देणे आवश्यक होते. ते सरकार आम्ही देऊ. आम्हाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष व अजित पवार यांचा मी फार आभारी आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचेही आभार मानले. ‘मोदी है तो मुमकिन है’ असे ते म्हणाले.
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांचे ‘ऑपरेशन महाराष्ट्र’, सकाळीच दिला सर्वांना जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 6:49 AM