Maharashtra CM: मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 07:02 AM2019-11-29T07:02:18+5:302019-11-29T07:03:00+5:30
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.... हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला.
- यदु जोशी
मुंबई : मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.... हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, त्याच ठिकाणी त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपस्थित जनसागराला साष्टांग दंडवत घालत उद्धव ठाकरे यांनी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. उद्धव असे नतमस्तक होताना लाखोंची गर्दी त्यांच्या या विनम्रभावाने हेलावून गेली. महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे दिग्गज नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ते कृतज्ञतापूर्वक भेटले, तेव्हाही टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. उद्धव यांनी आपले पुत्र आदित्य ठाकरे यांना आत्यंतिक प्रेमाने घट्ट जवळ घेतले, तेव्हा उपस्थित तमाम शिवसैनिकांचे डोळे पाणावले. हे दोघे तसेच उद्धव यांच्या पत्नी रश्मी अशा तिघांनी लाखोंच्या जनसमुदायास हात उंचावून अभिवादन केले.
सायंकाळी ६.४० वाजताच उद्धव यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी त्यांचे नाव पुकारले. भगवा कुर्ता घातलेले आणि लांब टिळा लावलेले उद्धव नेहमीच्याच हसतमुख मुद्रेने जागेवरून उठले. त्यांनी समोरच्या जनशक्तीला हात जोडून व उंचावून अभिवादन केले आणि ते शपथविधीच्या पोडियमवर उभे राहिले. तेव्हा ते क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हजारो हात उंचावले.
आधी बाळासाहेब आणि नंतर उद्धव यांचे लाखो शिवसैनिकांसमोर झालेले दसरा मेळावे अनुभवणाºया शिवाजी पार्कवर आज महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांतून अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीचे अनोखे शक्तिप्रदर्शन या नयनरम्य शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने बघावयास मिळाले.
शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी अहोरात्र झटलेले आणि अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेले शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे एलईडी स्क्रीनवर दिसताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य यांना भेटून अभिनंदन केले.
यांनी दिल्या शुभेच्छा
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कार्यरत राहील, असा मला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांना भावी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. या सरकारला व उद्धव ठाकरे यांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा
- डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान
महाराष्ट्रातील जनतेच्या इच्छा, आकांक्षा
पूर्ण करण्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नक्की यश येईल. एका वेगळ््या परिस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकार स्थापन केले आहे. या कार्यक्रमाची चोख अंमलबजावणी होईल, असा मला विश्वास आहे. शपथविधीला उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल मी दिलगीर आहे. उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही सरकारच्या भविष्यातील उज्ज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा.
- सोनिया गांधी, अध्यक्ष काँग्रेस
लोकशाहीचे अवमूल्यन करण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तिन्ही पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपाने एकत्र आले ही स्वागतार्ह घटना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सेक्युलर, स्थिर व गरिबांचे कल्याण करणारे सरकार मिळेल अशी मला आशा आहे.
- राहुल गांधी, कॉँग्रेसचे नेते
क्षणचित्रे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ
पुतळा मंचावर मधोमध ठेवण्यात आला होता.
उद्धव यांच्यासह प्रत्येक मंत्र्याने शपथ घेण्यापूर्वी शिवरायांना वंदन केले.
उद्धव आणि सर्व ठाकरे कुटुंबाने आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आणि
मगच ते शपथविधीसाठी आले.