महाराष्ट्राची प्रतिमा राज्यकर्त्यांनी काळवंडली, विविध पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 02:32 AM2019-11-24T02:32:06+5:302019-11-24T02:32:46+5:30
शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला.
- खलील गिरकर
मुंबई : शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. सर्वसामान्य जनता व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना याचा मोठा धक्का बसला. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का बसला आहे़ हा दिवस राज्याच्या राजकारणातील काळा दिवस असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. राज्याच्या प्रतिमेला तडा गेल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक म्हणाले, राज्याच्या इतिहासातील हा दु:खद दिवस असून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी रात्रीच्या काळोखात प्रयत्न करावे लागले. चोरकाम केल्याप्रमाणे सर्वांना अंधारात ठेवून हे काम करण्यात आले. अजित पवारांनी यामध्ये साथ देऊन त्यांच्या समर्थकांचा व आमदारांचा विश्वासघात केला आहे. पक्षात भूमिका मांडून त्यांनी चर्चा करण्याची गरज होती. त्यांच्या कृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शरद पवार पक्षाला या परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर काढतील व आज शपथ घेतलेल्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
शिवसेनेत कार्यरत असलेले राजेश कुचिक म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यपालांनी आजच्या कृतीमुळे आपल्या पदाचा मान राखलेला नाही हे स्पष्ट झाले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापण्यासाठी वेळ वाढवून देण्यास नकार देणाऱ्या राज्यपालांनी प्रक्रियेचे पालन केले नाही. त्यांनी राज्याच्या जनतेचा विश्वास गमावला आहे. लोकांच्या मनातून राज्यपाल पायउतार झाले आहेत. भाजपच्या सोयीने राजकारण करण्यास मदत करून त्यांनी राज्यपालपदाचे अवमूल्यन केले आहे. सकाळी जेव्हा ही बातमी पाहिली तेव्हा धक्का बसला. अजित पवार एकटे दिसल्याने त्यांनी बंड केल्याचा अंदाज आला. अजित पवारांनी राजकारणाचा पोरखेळ केला आहे. राज्याच्या राजकारणाचा तमाशा करून त्यांनी देशासमोर राज्याचे नाक कापले आहे. भाजपने दगाबाज पक्षाची ओळख करून दिली आहे. मात्र हे पक्ष बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, असा विश्वास कुचिक यांंनी व्यक्त केला. काँग्रेसने पाठिंबा देण्यास वेळकाढूपणा केल्याने भाजपला संधी मिळाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिलिंद पांचाळ यांनी आजची घटना खेदजनक असून पहाटे हा सर्व खेळ खेळताना निर्ढावलेल्या राजकारण्यांना शेतकरी आत्महत्या व इतर प्रश्नांची जाण झाली नाही, अशी टीका केली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला ही लांच्छनास्पद बाब आहे. सत्तेसाठी या थराला जाणाºया राजकारण्यांबाबत जनतेच्या मनात घृणा निर्माण झाल्याचे ते म्हणाले. सकाळी मित्राने हे वृत्त सांगितल्यावर झोप उडाली. ज्या तत्परतेने ही सर्व कामे केली गेली ती तत्परता सर्वसामान्यांच्या हितासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भाजपने ज्या सिंचन घोटाळ्याविरोधात आवाज उठवला त्याच आरोपीला थेट उपमुख्यमंत्रिपद देऊन भाजपने सत्ता हेच ध्येय असल्याचे दाखवून दिल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्राचाही घोडेबाजार अशी ओळख झाली
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी या घटनेमुळे देशात राज्याचे नाव खराब झाल्याचा आरोप केला. राज्याची आजपर्यंत एक वेगळी ओळख होती ती नष्ट झाली व उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणे राजकीय घोडेबाजार होणाºया राज्यांमध्ये आपला समावेश झाला. निवडणूक निकालानंतर ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चीड तयार झाली. ज्या मतदारांनी मते दिली ते हरले, लोकशाही हरली. लोकशाहीचा अपमान झाला आहे. केवळ सत्ता संपादन करण्यासाठी विविध पक्षांनी आपापली धोरणे, नीतिमत्ता गुंडाळली व आघाडी, युती करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे राजकारणात चांगल्या व्यक्तींचे काम नाही हा समज पुन्हा दृढ झाला आहे. राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत नेमकी कुणाची बाजू घ्यायची याचा संभ्रम झाला आहे. दोन कट्टर विरोधी पक्ष सत्तेसाठी एकत्र येतात, ज्यांच्याविरोधात लढलो त्यांनाच उपमुख्यमंत्रिपद दिले जाते, याचा काहीच ताळमेळ लागत नसल्याचे ते म्हणाले. राजकारण गलिच्छ आहे यावर पुुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. मतदार मायबाप नाही तर सत्ता मायबाप आहे हे स्पष्ट झाले, असे पवार म्हणाले.
विकास नक्कीच होईल
रिपब्लिकन पक्षाचे धोरण रिपब्लिकन पक्षाचे धोरण विभागप्रमुख नितीन तायडे यांनी या घटनेचे स्वागत केले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने सत्ता संपादन त्यांचा हक्क होता. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भाजपचाच मुख्यमंत्री होईल, अशी ग्वाही दिली होती. भाजपचा मुख्यमंत्री होईल याबाबत निश्चितता होती, मात्र थेट अजित पवार उपमुख्यमंत्री होतील असे वाटले नव्हते. सर्वसामान्यांच्या हितासाठी, विकासासाठी सत्ता राबवणे हे ध्येय असल्याने भाजप याद्वारे विकास करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती राजवटीमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसली होती, आता विकासाला वेग येईल असे तायडे म्हणाले.