महाराष्ट्रामध्ये सुरू झाली नव्या समीकरणाची नांदी, राष्ट्रीय व्यासपीठावर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 06:55 AM2019-11-29T06:55:13+5:302019-11-29T06:56:07+5:30
शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावर शिवसेनेचा भगवा आणि तिरंगा ध्वजावर पंजा तसेच घड्याळ असलेला तिरंगा असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीचे झेंडे यांनी गुरुवारी महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची नांदी दिली.
मुंबई : शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावर शिवसेनेचा भगवा आणि तिरंगा ध्वजावर पंजा तसेच घड्याळ असलेला तिरंगा असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीचे झेंडे यांनी गुरुवारी महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची नांदी दिली. तिन्ही राजकीय पक्षांचे दिग्गज नेते व्यासपीठावर होते. भाजपच्या विरोधात एकत्र आलेल्या पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनच घडवले. त्यातही शिवसैनिकांची गर्दी वाखाणण्याजोगी होती. अख्खे व्यासपीठही याच राजकीय समीकरणाचे प्रातिनिधिक रूप बनले होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह शिवसेनेच्या राज्यातील सर्व नेत्यांबरोबर प्रथमच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, के. सी. वेणुगोपाल, कपिल सिब्बल, अभिषेक मनू संघवी, अविनाश पांडे, राजीव शुक्ला, डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन व खासदार टी.आर. बालू, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी अशा महाविकास आघाडीच्या नेत्यांची मांदियाळी व्यासपीठावर होती.
या नव्या समीकरणाने शिवसेना व उद्धव ठाकरे केवळ महाराष्ट्रापुरते राहिले नसून, राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. आता भाजपविरोधातील सर्व पक्षांसमवेत ते दिसत राहतील व प्रसंगी केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देतानाही ते काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व करतील. गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला, तेव्हाही यापैकी बहुसंख्य पक्ष एकत्र होते. तेथे दोन्ही पक्षांतील आमदारांना फोडून भाजपने सरकार स्थापन केले, तर इथे भाजपने अजित पवारांच्या साह्याने बनविलेले सरकार पाडून ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
या सर्व सत्तानाट्याचे नेतृत्व अर्थातच शरद पवार यांच्याकडे होते. त्यामुळे शिवाजी पार्कच्या भव्य व्यासपीठावर ते येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर पवार यांची भेट घेतली, तेव्हाही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि एलईडी स्क्रीनवर जेव्हा जेव्हा शरद पवार दिसत, तेव्हा त्यांच्या नावाचा जयघोष होत होता. त्यांच्याप्रमाणेच खा. संजय राऊ त यांनीही भरपूर टाळ्या मिळविल्या. शिवसैनिकांच्या दृष्टीने राज्यात उद्धव ठाकरे सरकार येण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला भाजपचे नेते उपस्थित राहतील का, याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आवर्जून हजर होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही हजर होते आणि उद्धव यांच्या शपथविधीनंतर त्यांनी चुलत भावाला आलिंगन दिले. राज यांच्या आई कुंदा ठाकरे यांचे उद्धव यांनी आशीर्वाद घेतले. कुंदातार्इंना या वेळी अश्रू अनावर झाले. प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता, पुत्र अनंत तसेच कुमारमंगलम बिर्ला यांची उपस्थितीही उल्लेखनीय होती.