Join us

Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 1:01 PM

Maharashtra News : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल, अशी चर्चा जोरात आहे.

मुंबई - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल, अशी चर्चा जोरात आहे. मात्र किमान समान कार्यक्रम आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. त्यातच सोनिया गांधीशी झालेल्या चर्चेत शिवसेना आणि राज्यातील सत्तास्थापनेचा विषय चर्चिला गेला नाही, असा दावा शरद पवार यांनी केल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे. मात्र असे असले तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या संभाव्य महाशिवआघाडीमधील सत्तावाटप अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे निश्चित झाले आहे.

महाशिवआघाडीमधील सत्तावाटपाच्या फॉर्मुल्याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तानुसार नव्या फॉर्म्युल्यामध्ये मुख्यमंत्रिपद हे पूर्ण पाच वर्षे शिवसेनेकडे देण्याचे तसेच मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येईल.

सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यात मंत्रिपदांच्या वाटपाबाबतही निश्चिती झाली आहे. त्यानुसार ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला १५, ५४ आमदारांचे पाठबळ पाठीशी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर ४४ आमदार असलेल्या काँग्रेसला १३ मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले आहे.

त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणाची निवड करावी हा निर्णय शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सोडला आहे. दरम्यान, राज्यात गैरभाजपा सरकार स्थापन व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार प्रयत्नशील आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबची चर्चा या केवळ अफवा आहेत, असे मलिक यांनी म्हटले आहे. 

मात्र काल सोनिया गांधींशी झालेल्या बैठकीत सत्तावाटप आणि शिवसेना यांच्याबाबत चर्चाच झाली नसल्याची गुगली  शरद पवार यांनी टाकल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती.  शरद पवार म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत असं सांगितल्याने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला होता. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुख्यमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019