Join us

Maharashtra Government: आधारकार्ड, ओळखपत्रासह २२ तारखेला मुंबईत हजर राहा; आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 7:32 PM

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यास पाठिंबा आहे, हे सूचित करणारे आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना दिल्लीत वेग आला असताना शिवसेना आमदारांना येत्या २२ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना मातोश्रीवर बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. एकीकडे दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची खलबतं सुरु आहेत तर मुंबईत शिवसेनेकडून सत्तास्थापनेची तयारी करण्यात येत आहे. 

मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीला येताना आमदारांनी आधारकार्ड, ओळखपत्र आणि ५ दिवसांचे कपडेही सोबत आणा असंही सांगण्यात आल्याची माहिती मिळते. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी दिल्लीत उद्या आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील बोलणी शिवसेनेसोबत होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यास पाठिंबा आहे, हे सूचित करणारे आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे, तसेच आमदारांच्या सह्या जबदस्तीने किंवा अन्य माध्यमांतून घेण्यात आलेल्या नाहीत, असे प्रमाणित करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची प्रतिस्वाक्षरी या पत्रांवर असावी, अशी अट राज्यपालांनी घातली आहे.

राज्यपालांच्या या अटीने पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या संयुक्त विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना विलंब होत आहे. या अटीनुसार आमदारांची वैयक्तिक स्वाक्षरी मिळविण्यासाठी नेते धावपळ करीत आहेत. मात्र पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी काही आमदारांनी आपल्या मागण्या पक्षनेतृत्वापुढे रेटल्या असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. आमदारांची ओळख परेड घेण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे. मात्र त्याऐवजी आपापल्या पक्षांच्या प्रत्येक आमदाराच्या पाठिंब्याचे सहीनिशी पत्र सादर करण्यास या पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे. पूर्वीच्या काही राज्यपालांनीदेखील हीच पद्धत अवलंबिली असल्याने या पक्षांचा नाईलाज झाला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांना आधारकार्ड, ओळखपत्र सोबत आणण्यास सांगितलं असावं असंही बोललं जातं आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना दिल्ली आणि मुंबईत वेग आला असून राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार का हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.  

टॅग्स :शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019