Maharashtra Government: सत्तानाट्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा, गुप्तवार्ता विभागाचे प्रत्येक घडामोडीवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 05:49 AM2019-11-24T05:49:33+5:302019-11-24T05:51:19+5:30

गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राज्यातील राजकीय नाट्याला शनिवारी पहाटे अनपेक्षितपणे वेगळे वळण मिळाल्याने, समस्त महाराष्ट्राबरोबरच अति वरिष्ठ पोलीस अधिकारीही अंचबित झाले.

Maharashtra Election, Maharashtra Government: Alert in the state, alert to every incident of intelligence department | Maharashtra Government: सत्तानाट्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा, गुप्तवार्ता विभागाचे प्रत्येक घडामोडीवर लक्ष

Maharashtra Government: सत्तानाट्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा, गुप्तवार्ता विभागाचे प्रत्येक घडामोडीवर लक्ष

Next

- जमीर काझी

मुंबई : गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राज्यातील राजकीय नाट्याला शनिवारी पहाटे अनपेक्षितपणे वेगळे वळण मिळाल्याने, समस्त महाराष्ट्राबरोबरच अति वरिष्ठ पोलीस अधिकारीही अंचबित झाले. शिवसेना,राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येईल, असे जवळपास स्पष्ट झाले असताना, शुक्रवारी मध्यरात्रीपासून नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पहाटे राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या घेतलेल्या शपथविधीपर्यंत घडलेल्या घटनांमुळे पोलीस वर्तुळातही आश्चर्य व्यक्त होत आहेत. या घडामोडीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याच्या शक्यतेने राज्यात सर्वत्र दक्षता इशारा देण्यात आला आहे.

सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालये, नेत्यांची घरे व राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल यांनी त्याबाबत सर्व पोलीस घटक प्रमुखांना आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शनिवारी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची कार्यालये, नेत्यांच्या निवासस्थाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

नरिमन पाइंट येथील भाजपचे कार्यालय, वर्षा बंगला, यशवंतराव चव्हाण केंद्र, राष्टÑवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांचे वास्तव्य असलेल्या त्यांच्या बंधूंचे नेपियन्सी रोडवरील ब्रायटन बिल्डिंग येथील निवासस्थान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वांद्रेतील मातोश्री निवासस्थान व शिवसेनेचे मुख्यालय, तसेच आमदार असलेले हॉटेल ललितच्या परिसरातही पोलिसांची मोठी कुमक तैनात केली आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी, आमदार, कार्यकर्त्यांबरोबरच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, ओबी व्हॅनची मोठी गर्दी झालेली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाकडूनही या परिसरावर, राज्यातील प्रत्येक घडामोडीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेने महायुतीतून बाहेर पडत विरोधी कॉँग्रेस आघाडीशी संधान बांधले. शुक्रवारी तीनही पक्षांच्या नेत्यांकडून त्याबाबत अधिकृत घोषणा झाल्याने राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल, असे निश्चित झाले होते. राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येण्याची स्पष्ट झाल्याने, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शुक्रवारी सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये बदललेल्या राजकीय घडामोडींनुसार सुरक्षा व्यवस्थेचे प्राधान्यक्रम बदलण्यात आले होते. त्याबाबत अधिकाºयांना सूचना देऊन आपल्या हद्दीत विशेष काळजी घेण्याचे सुचविले होते. त्यानंतर, मध्यरात्री भाजपने अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. पहाटे राष्टÑपती राजवट हटविण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळांची मंजुरी मिळाल्यानंतर सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काही तासांत घडलेल्या या घडामोडींबाबत बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारीही अनभिज्ञ होते. त्यामुळे हा प्रकार समजल्यानंतर पोलीस महासंचालक जायस्वाल, अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ, महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याशी चर्चा करून राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची सूचना त्यांनी केली, तर मुंबईचे आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबईतील सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालय, नेत्यांची निवासस्थाने व नवनियुक्ती आमदार असलेल्या ठिकाणी बंदोबस्त वाढविला. बंदोबस्तावर ते स्वत: लक्ष ठेवून होते.


विशेष सुरक्षा व्यवस्था
नव्या सरकारला विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी राज्यपालांनी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे आठवडाभर राज्यातील राजकीय घडामोडी वेगवान होणार असल्याने दक्षता घेण्यात येत आहे, तसेच या कालावधीत ‘२६/११’च्या घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असल्याने विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. राजकीय घडामोडींमुळे समाज कंटक, राष्टÑविरोधी संघटना, व्यक्तींकडून घातपाती कृत्य होऊ नये, यासाठी पोलिसांसह सर्वांनीच सतर्कता बाळगण्याची सूचना महासंचालकांनी केलेली आहे.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Alert in the state, alert to every incident of intelligence department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.