मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपाचं बिनसल्यानंतर आता राज्यात नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. महाशिवआघाडी अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येत राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. मात्र अद्यापही शिवसेना-भाजपा युती अधिकृतपणे तुटल्याचं कोणत्याही पक्षाने जाहीर केलं नाही.
युती तुटण्याचं पाप कोणी माथी कोण घेणार याच उद्देशाने शिवसेना-भाजपाने सावधरित्या पावले उचलली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातून शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी माध्यमांनीही त्यांना एनडीएतून बाहेर पडला का? असा सवाल केला असता त्यावर त्यांनी तुम्हाला जो अर्थ लावायचा आहे तो लावा असं सांगत प्रश्नाला बगल दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी द रिट्रिट हॉटेलला पत्रकार परिषद झाली. त्यावेळी माध्यमांनी युती तुटली का? या विचारलेल्या प्रश्नाला टोलवाटोलवीची उत्तरं दिली त्यामुळे या दोघांमध्ये अद्यापही काही बोलणी सुरु आहेत असा प्रश्न निर्माण झाला.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, कदाचित पोपट मेला आहे हे कोणी जाहीर करायचं हा प्रश्न असू शकतो. आम्ही कोणतीही अट घातली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विरोधी पक्षात बसण्याची होती. मात्र राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर शिवसेनेकडून आम्हाला अधिकृत प्रस्ताव आला त्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे असं त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेसोबत आमची चर्चा सुरु आहे. सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक सुरु आहे. आमच्या दोघात एकवाक्यता आहे. किमान समान कार्यक्रमावर चर्चा होईल. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी बोलणी करु असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, महाराष्ट्रावर हा जो राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा फिरवला गेला आहे याची पटकथा जणू आधीच लिहून ठेवली होती. विधानसभा सहा महिन्यांसाठी संस्थगित करून राज्यपालांनी प्रशासकीय सूत्रे राजभवनाकडे घेतली आहेत. आता सल्लागारांच्या मदतीने ते इतक्या मोठय़ा राज्याचा कारभार हाकतील. राज्यपाल हे अनेक वर्षे संघाचे स्वयंसेवक होते. उत्तराखंड या पहाडी राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत, पण महाराष्ट्र वेगळे राज्य आहे. आकाराने आणि इतिहासाने ते भव्य आहे. येथे वेडेवाकडे काही चालणार नाही. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी रात्री साडेआठपर्यंतची मुदत दिली गेली होती, पण थोडा वेळ वाढवून दिला तर बरे होईल असे विचारताच ‘8.30’ सोडाच, पण भरदुपारीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली अशी टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे.