मुंबई - जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय पेचानंतर अखेर आता सत्तासमीकरणे जुळताना दिसत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडी आता आकारास येत आहे. मात्र काँग्रेसच्या आक्षेपानंतर या आघाडीसाठी यापूर्वी निश्चित झालेल्या महाशिवआघाडी या नावातील शिव हटवण्यास राजी झालेल्या शिवसेनेला भाजपाने टोला लगावला आहे.
भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विट करत शिवसेनेला चिमटा काढला आहे. ‘’महाशिवआघाडीमधील शिव नावाला काँग्रेस श्रेष्ठींकडून आक्षेप घेण्यात आल्यानंतर या महाशिवआघाडीमधील शिव हे नाव काढण्यास शिवसेनेने संमती दिली आहे. आता ही आघाडी महासेना आघाडी म्हणून ओळखली जाईल. अर्थात यातील सेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची की अफझल खानाची यावर अहमद पटेल अंतिम निर्णय घेतील,’’ असे ट्वविट अवधूत वाघ यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीला महाशिवआघाडी असे नाव प्रस्तावित होते. मात्र काँग्रेसने या आघाडीतील शिव या नावाला आक्षेप घेतला होता. तसेच शिवसेनेशी आघाडी करताना काँग्रेस आपल्या विचारांशी कुठलीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.