Maharashtra Government: "भाजपचेच सरकार, मुख्यमंत्रीही आमचाच!"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:42 AM2019-11-16T04:42:07+5:302019-11-16T04:43:09+5:30
भाजपाचेच सरकार राज्यात येणार असून मुख्यमंत्रीदेखील भाजपचाच असेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई : भाजपाचेच सरकार राज्यात येणार असून मुख्यमंत्रीदेखील भाजपचाच असेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत हीच भूमिका मांडल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत पाटील म्हणाले की, राज्यात क्रमांक एकचा पक्ष भाजपच आहे. भाजपचे १०५ आमदार निवडून आले आहेत. मित्रपक्ष तसेच अपक्ष आमदार ज्यांनी भाजपला समर्थन दिले आहेत असे १४ धरून भाजपचे संख्याबळ ११९ होते.त्यामुळे भाजपला वगळता राज्यात सरकार स्थापनच होऊ शकत नाही.भाजपच्या दादर येथील कार्यालयात तीन दिवसीय चिंतन बैठक सुरू आहे. आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांना माहिती देताना पाटील म्हणाले की, भाजप ५९ जागांवर पराभूत झाला.त्यापैकी ५५ जागांवर भाजपाच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत.आम्ही इतर पक्षातून आलेल्या २६ जणांना उमेदवारी दिली.त्यापैकी १६ जण विजयी झाले आहेत. १९९० नंतर कोणत्याच पक्षाला १०० जागांवर विजय मिळालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मिळूनही १०० आमदार यावेळी आलेले नाहीत. त्यामुळे सर्वच आघाडयांवर विचार करता भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष आहे.
भाजपला १ कोटी ४२ लाख मते मिळाली. त्यानंतर दुसºया क्रमांकावर ९२ लाख मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यानंतर शिवसेनेला ९० लाख मते मिळाली आहेत. म्हणजे दुसºया क्रमांकावरील पक्षही भाजपापासून खूप दूर आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपा २६० जागा लढली होती त्यापैकी १२२ जागा जिंकल्या होत्या.आता १६४ जागा लढलो त्यापैकी १०५ जागा जिंकल्या.सर्वात जास्त १२ महिला आमदार भाजपाच्याच आहेत. अनुसूचित जाती/जमातींचे प्रत्येकी ९ आमदार भाजपाचे निवडून आले आहेत, असे पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे.त्याला जास्तीतजास्त मदत कशी मिळू शकेल यावर बैठकीत विचार करण्यात आला. २३ हजार कोटींची पीकविम्याची रक्कम त्याला मिळवून देण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार आहे. प्रत्येकाने मतदारसंघात जावून शेतक-यांना मदत आणि दिलासा द्यावा, अशा सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले. राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चपराक दिली आणि केंद्र सरकारला क्लीन चिट दिली. आता राहुल गांधी यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी पाटील यांनी केली.