Join us

Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 8:59 AM

मृतप्राय काँग्रेसमध्ये नवचैतन्य जागवण्यासाठी हयात घालवली होती का बाळासाहेब ठाकरेंनी?

मुंबई - मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेचा इतक्या टोकाचा आग्रह नाकारत, सत्ता झुगारण्याची तयारी चालवण्याची भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे ठरते आहे. भाजपा-सेनेने युती करून निवडणूक लढवली होती. सत्ता मिळवण्याइतपत संख्याबळही लोकांनी युतीच्या पारड्यात टाकले होते. तरीही राज्यात त्यांचे सरकार स्थापन होऊ शकत नाही, हे तर त्याहून आश्चर्य आहे असं सांगत संघाचे मुखपत्र असलेल्या तरुण भारतमधून शिवसेना-भाजपाचे कान टोचले आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी स्वार्थ साधणार नाही का, असा प्रश्न विचारला गेल्यावर संजय राऊतांनी ज्या समंजसपणे काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका मांडली, राजकारणात सत्तेची, पदांची अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नसल्याचे सांगितले, त्याच राऊतांना 105 सदस्यांचे पाठबळ लाभलेल्या भाजपाने, 56 सदस्यसंख्या लाभलेल्या शिवसेनेच्या तुलनेत मुख्यमंत्रिपद अधिक आग्रहीपणे मागणे मान्य होत नाही, ही बाबतरी कुठे सहज पचनी पडते? पण, तसे घडतेय्‌ खरं असा टोलाही तरुण भारतने लगावला आहे. 

तरुण भारत अग्रलेखाती महत्वाचे मुद्दे 

  • शेवटी महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली आलाच! एक अपरिहार्य दुर्दैव इथल्या जनतेच्या वाट्याला आले. कुणाची मुजोरी, कुणाचा दुराग्रह, कुणाचा बालहट्‌ट, कुणाचे राजकारण, कुणाचे षडयंत्र त्यासाठी कारणीभूत ठरले, हा भाग अलहिदा! पण, कुणाच्यातरी सत्तापिपासू भूमिकेचा दुष्परिणाम, जरासाही दोष नसलेल्या जनतेच्या माथी मारला गेला, हे मात्र खरं. 
  • सर्वात मोठा पक्ष विरोधी बाकांवर अन्‌ विचारधारेपासून तर कार्यपद्धतीपर्यंत कशाचबाबतीत एकमेकांशी ताळतंत्र न जुळणारे तीन छोटे छोटे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची तयारी करीत असल्याचे अन्‌ 288 मतदारसंघांतून एक आमदार कसाबसा निवडून आणण्याची ‘ताकद’ लाभलेली मनसे पैलतीरावर बसून शहाणपणाचे धडे देत असल्याचे चित्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामित्वाचे पोवाडे गाणार्‍या राज्याला न शोभणारे आहे. 
  • अस्मितेच्या नावाखाली काहींच्या राजकीय आकांक्षा ताकदीपेक्षा अधिक विस्तीर्ण झाल्या अन्‌ हे भोग भोगण्याची वेळ महाराष्ट्रावर आली. कालपर्यंत बाळासाहेब ठाकरे खुद्द म्हणायचे, सोनियांसमोर झुकणारे लोक हिजडे (हा बाळासाहेबांचा शब्द जसाच्या तसा मुद्दाम ठेवला आहे.) आहेत म्हणून अन्‌ आता त्यांच्याच घरातली माणसं सत्तेसाठी त्याच सोनियांसमोर कुर्निसात करायला सरसावली असल्याची परिस्थिती विदारक आहे. 
  • निवडणुकीच्या काळात ज्यांना शिवीगाळ करून आपल्या उमेदवारांचा प्रचार केला, ज्यांच्याविरुद्ध उभे करून आपले उमेदवार निवडून आणलेत, त्या सर्वार्थाने ‘विरोधक’ असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची शय्यासोबत करण्याकरिता लोकांनी शिवसेनेला निवडून दिलेले नव्हते. 
  • लोकांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादीचीही सत्तास्थापनेकरिता निवड केलेली नव्हती. पण, राज्याच्या राजकीय क्षितिजातून हद्दपार होण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला या निमित्ताने नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचे महापातक करण्याचा शिवसेनेने चंगच बांधलाय्‌ म्हटल्यावर कोण काय करणार? 
  • शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची हौसच इतकी भारी ठरली आहे की, ती पूर्ण करून-करवून घेण्यासाठी आपण किती रसातळाला जातो आहे, याचेही भान त्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना आणि काही वाचाळवीरांना उरलेले नाही. 
  • आपण जनमताचा धडधडीत अपमान करीत असल्याच्या वास्तवाचाही त्यांना विसर पडला आहे. त्यामुळेच, हे अघटित घडण्याच्या मार्गावर आहे. यासाठी शिवसेना सर्वस्वी जबाबदार असून, महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करते की नाही, हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे. 
  • याचा अर्थ, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची कामना करूच नये का? तर, जरूर करावी. त्यासाठी जमेल तेवढा आग्रहही धरावा. पण, तो पूर्ण होत नाही म्हणून हा आत्मघातकी डाव खेळण्याची त्याची तर्‍हा मात्र विपरीत अर्थाने इतिहास निर्माण करणारी ठरणार आहे. 
  • राज्यातील तमाम जनतेने दिलेला कौल अमान्य करीत शिवसेनेने चालवलेल्या हट्‌टाचा परिणाम म्हणून इथे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मतदानानंतर महिनाभराचा काळ लोटत नाही तोच, ही परिस्थिती उद्भवणे दुर्दैवी आहे. शेतकरीहिताच्या बाता करणारी राजकारणातली सारीच मंडळी, प्रत्यक्षात स्वार्थाच्या राजकारणात पाऽर डुंबली असल्याचे वास्तवही वेदनादायी आहे. 
  • ज्यांनी जबाबदारपणे सरकार चालवणे अपेक्षित होते, तीच मंडळी अतिशय बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र न पटणारे आहे. एरवी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केली, एवढेच काय ते सत्य आहे. बाकी, त्यासाठी जबाबदार तर इथली राजकीय परिस्थिती अन्‌ ती निर्माण करणारे राजकीय नेतेच आहेत ना?
  • यंदाच्या निवडणुकीत धड पन्नासही सदस्य निवडून आणता आले नाहीत, त्या मृतप्राय काँग्रेसचे नेते आता राज्यात भाजपाविरहित सरकार स्थापन करण्याच्या वल्गना करीत आहेत. कुणी दिले हो बाळासाहेब थोरातांच्या वाणीला हे बळ? आम्ही एकत्र आलो तर माईचा लाल आम्हाला हरवू शकत नाही, ही माजोरी भाषा आली आहे अजित पवारांच्या तोंडी आता. 
  • कालपर्यंत ते विधानसभेत विरोधी बाकांवर बसण्याचा जनादेश असल्याने सरकार स्थापन करण्यास असमर्थता हताशपणे व्यक्त करीत होते. आज अचानकपणे त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले आहे. कधी नव्हे एवढा आत्मविश्वास त्यांच्यात जागला आहे. उद्धव ठाकरेंपासून तर संजय राऊतांपर्यंत, कुणालातरी करता येईल या बदललेल्या परिस्थितीची मीमांसा? 
  • मृतप्राय काँग्रेसमध्ये नवचैतन्य जागवण्यासाठी हयात घालवली होती का बाळासाहेब ठाकरेंनी? त्यांनी आयुष्यभर विरोध केला, त्या काँग्रेसला जवळ करण्याचा मुद्दा मुख्यमंत्रिपदाच्या झगमगाटापुढे इतका थिटा पडावा उद्धवांच्या लेखी? 
  • राज्यातील जनतेचा काकणभरही दोष नसताना, कुणाच्यातरी राजकीय स्वार्थापायी राष्ट्रपती राजवट त्यांच्यावर लादली गेली आहे. ही परिस्थिती टाळता आली असती का, याचा विचार भाजपा-सेनेच्या नेत्यांनी एकदा जरूर करावा. 
  • सारेच कुठल्या ना कुठल्या स्वार्थासाठी एकत्र येताहेत म्हटल्यावर ते कडबोळे प्रत्यक्षात एकमेकांच्या संगतीनं कितपत काम करू शकतील अन्‌ किती काळ एकत्र नांदतील, याचा अंदाज आजच वर्तवणे कठीण आहे. 
  • पण, यातून कुणाचीतरी मुख्यमंत्रिपदाची हौस मात्र ‘फिटणार’ असल्याने आणि केवळ तेवढ्यासाठीच त्यांनी सारा महाराष्ट्र, लोकांनी नाकारलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असल्याने, सध्यातरी उघड्या डोळ्यांनी तमाशा बघण्यापलीकडे जनतेच्या हातातही काहीच राहिलेले नाही. 

 

टॅग्स :राष्ट्रीय स्वयंसेवक संघशिवसेनाभाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019बाळासाहेब ठाकरे